‘रामकृष्ण हरि, वाजवा तुतारी’, असे म्हणणार्‍या निधर्मीवाद्यांचे ढोंग उघडे पडले !

देशातील राजकारणात गेल्या दशकभरात बरेच पालट झाले आहेत. त्यांपैकी एक मोठे परिवर्तन, म्हणजे धर्म राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या धार्मिक भावना उघडपणे व्यक्त केल्यानंतर आणि ‘देशातील जनतेचा त्यांना पाठिंबाही मिळत आहे’, हे पाहिल्यानंतर विरोधी पक्षही अडचणीत आले. गेल्या अनेक दशकांच्या राजकारणात हिंदु धर्म संपवण्यासाठीच कारस्थाने रचणार्‍या काँग्रेसचे युवराजही (राहुल गांधी) त्याला अपवाद राहिले नाहीत. वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देणे चालू केले होते. वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून राहुल गांधींच्याही पुढे जाऊन समाजवादी, नास्तिक, धर्मनिरपेक्षतावादी किंबहुना हिंदुविरोधी अशीच ज्यांची ओळख आहे, त्या पवार कुटुंबियांनाही अखेर मंदिरांनाही भेटी द्याव्या लागल्या आहेत.

१. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे देवाच्या दारी !

अजित पवार यांनी वेगळे होत ते राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष झाले. यानंतर शरद पवार यांच्या गटाला ‘तुतारी’ हे निवडणूक चिन्ह मिळाले. शरद पवार गटाच्या नेत्या आणि ‘स्टार प्रचारक’ (महत्त्वाचे प्रचारक) सुप्रिया सुळे या त्यांच्या प्रचारसभांमध्ये ‘तुतारी चिन्हा’चा ज्या प्रकारे प्रचार करत होत्या, त्यावरूनच वारे फिरले आहे, हे दिसून येत होते. ‘रामकृष्ण हरि, वाजवा तुतारी’, अशी घोषणा सुप्रिया सुळे यांनी अनेक सभांमध्ये दिली. गेल्या वर्षीही त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेऊन वारकरी महिलांसमवेत भाकरी थापल्या होत्या.

शरद पवार हे तर ‘स्वतः यंदाच्या आषाढी वारीत पायी चालतील’, अशा प्रकारे वातावरण निर्माण केले गेले. यंदाच्या गणेशोत्सवात शरद पवार हे ३० वर्षांनंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते. गेली अनेक वर्षे न चुकता ‘इफ्तार’ मेजवानीचे आयोजन करणारे शरद पवार यांना देवतेच्या चरणी पाहूनच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

२. हा दुटप्पीपणाच !

एकीकडे हिंदू मतपेढीला आकर्षित करण्यासाठी ‘रामकृष्ण हरि’चा जयघोष करणारे शरद पवार त्यांच्यासमोरच प्रभु श्रीरामाचा अवमानकारक उल्लेख होत असतांना मात्र मूग गिळून गप्प बसले होते. ‘संभाजी ब्रिगेड’च्या व्यासपिठावर ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीरामाचा जो अवमान केला, त्यावर शरद पवार यांनी एका शब्दानेही भाष्य केलेले नाही कि साधा निषेधही नोंदवलेला नाही. सुप्रिया सुळे यांनाही त्याविषयी बोलावेसे वाटलेले नाही, हेही येथे अधोरेखित करावेसे वाटते.

एकीकडे मतांची बेगमी करण्यासाठी मंदिरांना भेटी द्यायच्या आणि दुसरीकडे विद्रोही विचारसरणीला खतपाणी घालणार्‍यांच्या व्यासपिठावर जायचे, ही दुटप्पी भूमिका आहे. हिंदूंचा अवमान करणार्‍यांचा कैवार घेणे सोडायचे नाही आणि हिंदूंची मते प्रभावित करण्यासाठी ‘रामकृष्ण हरि’ही म्हणायचे. ज्ञानेश महाराव यांच्यावर आवश्यक ती कारवाई होईलच; पण त्या निमित्ताने पवार कुटुंबियांसह अनेक तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांचे पितळ उघडे पडले आहे.

(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’)

संपादकीय भूमिका

हिंदूंचा अवमान करणार्‍यांचा कैवार घेणे आणि हिंदूंची मते प्रभावित करण्यासाठी देवाचे नाव घ्यायचे, अशा दुटप्पींना हिंदूंनी जाणावे !