सांगली, २१ सप्टेंबर (वार्ता.) – प्रतापगडावरील अफझलखानाच्या अनधिकृत दर्ग्यावर बुलडोजर फिरवायचा जसा धाडसी निर्णय महायुती सरकारने घेतला, तसाच अफझलखानवधाचे भव्य शिल्प उभारण्याचा निर्णय तातडीने घ्यावा. त्या समारंभाला महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमंत्रित करून सरकारने चोख उत्तर द्यावे, अशा मागणीचे निवेदन ‘श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलना’चे निमंत्रक, हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी २१ सप्टेंबर या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २१ सप्टेंबर या दिवशी दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, मालवण राजकोट येथील कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून महाविकास आघाडी राजकारण करत आहे. त्याला उत्तर म्हणून राज्यातील महायुती सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखान आणि सय्यद बंड यांच्या थडग्यासमोर अफझलखानवधाच्या भव्य शिल्पाचे मोठ्या थाटामाटात अनावरण करावे. या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमास सहस्रोंच्या संख्येने शिवभक्त घेऊन येऊ.