अनाकलनीय घटना घडल्‍याने सर्वच अचंबित

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील व्‍यक्‍तीशी स्‍वप्‍नात येऊन मृतात्‍मा बोलला आणि रत्नागिरी जिल्‍ह्यात त्‍याचा मृतदेह सापडला !

खेड – सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील आजगाव, सावंतवाडी येथील व्‍यक्‍तीच्‍या स्‍वप्‍नात एका मृत झालेल्‍या व्‍यक्‍तीने साहाय्‍य मागितले. वारंवार पडलेल्‍या स्‍वप्‍नांमुळे संबंधित व्‍यक्‍तीने पोलिसांना माहिती दिल्‍यावर पोलिसांनी त्‍यानुसार चौकशी केली असता रत्नागिरी जिल्‍ह्यातील खेड तालुक्‍यातील भोस्‍ते घाटाच्‍या परिसरात एका पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी प्रथम दर्शनी अहवाल नोंद करून सर्वांना अचंबित करणार्‍या या घटनेची चौकशी चालू केली आहे.

१. १७ सप्‍टेंबर या दिवशी योगेश पिंपळ आर्या (वय ३० वर्षे, रहाणार आजगांव, सावंतवाडी) हे खेड पोलीस स्‍थानकात गेले. त्‍यांनी पोलिसांना सांगितले, ‘मला वारंवार स्‍वप्‍ने पडतात. त्‍यामध्‍ये खेड रेल्‍वे स्‍थानकाच्‍या समोरील डोंगरात पुरुषाचे प्रेत असल्‍याचे दिसते. तो पुरुष माझ्‍या स्‍वप्‍नात येऊन त्‍याला साहाय्‍य करण्‍यास मला सांगत असतो.’

२. योगेश आर्या यांच्‍या बोलण्‍यावर विश्‍वास ठेवून पोलिसांनी संबंधित भागात शोध घेतला असता भोस्‍ते घाटातील जंगलात एका आंब्‍याच्‍या झाडाजवळ कुजल्‍याचा दुर्गंध येत होता. पोलिसांनी जवळ जाऊन पाहिले असता आंब्‍याच्‍या झाडाच्‍या फांदीला काळ्‍या रंगाची वायर आणि प्‍लास्‍टिकचा पट्टा बांधलेला अन् टॉवेलने बांधून गळफास घेतलेल्‍या अवस्‍थेतील व्‍यक्‍तीचा मृतदेह सापडला.

३. अंगावर राखाडी रंगाचे जॅकेट, राखाडी रंगाची पँट होती. मृतदेहाच्‍या अवस्‍थेवरून तो सडलेल्‍या अवस्‍थेतील मृतदेह अनेक दिवसांचा असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. पोलीस या प्रकरणाचे अन्‍वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

अशा घटनांविषयी बुद्धीप्रामाण्‍यवाद्यांना काय म्‍हणायचे आहे ?