३.१.२०२४ या दिवशी सोलापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली. या सभेच्या वेळी धर्मप्रेमी पुरुष आणि स्त्रिया यांनी केलेल्या साहाय्याविषयी या लेखात जाणून घेऊया.
(भाग १)
१. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारसेवेत धर्मप्रेमींनी केलेले साहाय्य
१ अ. ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा चांगली व्हावी’, अशी तळमळ असलेल्या सौ. हेमा म्हेत्रे ! : ‘सौ. हेमा म्हेत्रे यांनी सभेचा अधिकाधिक प्रचार केला. ‘सभा चांगली व्हावी आणि स्वतःची काहीतरी सेवा व्हावी’, अशी त्यांची तळमळ होती.’ – कु. रश्मी चाळके, सोलापूर
१ आ. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचार सेवेत, तसेच विविध सेवांमध्ये सक्रीय सहभाग घेणारे श्री. लक्ष्मीनारायण गोली आणि सौ. गोली : ‘श्री. लक्ष्मीनारायण गोली आणि सौ. गोली यांचा हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या विविध सेवांमध्ये सक्रीय सहभाग होता, उदा. सभेचा प्रचार करणे, सभेसाठी अर्पण गोळा करणे, सभेसाठी २ दिवसांसाठी ५०० जणांच्या महाप्रसादाचे नियोजन करणे, सभेसाठी चारचाकी गाडी उपलब्ध करून देणे इत्यादी.
१ इ. हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी वेळ देऊन प्रचारसेवा, तसेच अन्य सेवा करणारे ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचक श्री. विनायक वंगारी ! : ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचक श्री. विनायक वंगारी यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी वेळ दिला. त्यांनी बैठकांचे आयोजन करणे, वैयक्तिक संपर्क करणे, महाप्रसादाचे नियोजन करणे, धर्मप्रेमींना सभेला नेण्याचे नियोजन करणे, अशा विविध सेवा केल्या.
१ ई. महिलांना सभेला जाण्यासाठी उद्युक्त करणार्या सौ. भारती पोगुल आणि त्यांची मुलगी कु. श्रीविद्या पोगुल ! : सौ. भारती पोगुल आणि त्यांची मुलगी कु. श्रीविद्या पोगुल यांनी महिलांच्या बैठकांचे आयोजन केले. त्यांनी महिलांना एकत्र करून सभेला नेण्याचे नियोजन केले.
१ उ. स्वतःचा व्यवसाय सांभाळून ८ दिवस नियमित ६ ते ८ घंटे सभेचा प्रचार करणारे उद्योजक श्री. रमेश झुंजा ! : श्री. रमेश झुंजा उद्योजक आहेत. त्यांनी स्वतःचा व्यवसाय सांभाळून ८ दिवस नियमित ६ ते ८ घंटे सभेचा प्रचार केला, उदा. विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करणे, वैयक्तिक संपर्क करणे, अर्पण मिळवणे इत्यादी.
१ ऊ. स्वतःकडे अन्य एका सेवेचे दायित्व असूनही सभेसाठी प्रचार बैठका आयोजित करणारे आणि सभेनिमित्त सेवा करणार्या साधकांसाठी महाप्रसादाचे नियोजन करणारे श्री. चंदन बिराजदार ! : हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या कालावधीत सोलापूर येथे श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेची पूर्वसिद्धता चालू होती. एक धर्मप्रेमी श्री. चंदन बिराजदार यांच्याकडे या यात्रेसंबंधी सेवेचे मोठे दायित्व होते. असे असूनही त्यांनी सभेसाठी प्रचार बैठकीचे आयोजन केले. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी यात्रेसंबंधी सेवा केल्या, त्या ठिकाणी सभेचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सभेनिमित्त सेवा करणार्या साधकांसाठी एक वेळच्या महाप्रसादाचे नियोजन केले.’
– कु. वर्षा जेवळे, सोलापूर
१ ए. धर्मांध बहुसंख्य असलेल्या एका भागात एका धर्मप्रेमीने प्रचार बैठकीचे आयोजन करणे : ‘विजयनगर येथील एका धर्मप्रेमीने त्यांच्या भागामध्ये बैठकीचे नियोजन केले. त्या भागात धर्मांधांची अनेक घरे होती, तरीही त्या बैठकीला १५ जण उपस्थित होते. त्या धर्मप्रेमी दादांच्या तळमळीने सभेसाठी ४० ते ४५ जण चारचाकी वाहनाने सभेला आले.’ – सौ. सोनल कोठावळे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सोलापूर
२. शिलाई कारखान्यात काम करणार्या एका धर्मप्रेमींनी ५०० झेंडे शिवून देणे
‘जुना विडी घरकुल’ येथील श्री. अमर बोगा शिलाई कारखान्यात काम करतात. त्यांनी सभेसाठी लागणारे झेंडे शिवण्याची सेवा केली. त्यांनी दिवसभर कारखान्यात काम केले आणि रात्रीच्या वेळेत ५०० झेंडे २ दिवसांत शिवून दिले. त्यांनी सभेनिमित्त स्वतः अर्पण दिले आणि इतरांकडूनही अर्पण मिळवले.’ – श्री. मिनेश पुजारे, सोलापूर
३. श्री. केदार बिराजदार यांनी सभेचा विषय ऐकल्यावर सभेच्या सेवेतील साधकांसाठी महाप्रसाद दिला आणि सभेसाठी धर्मप्रेमींना एकत्रित आणण्याचे नियोजन केले.
४. श्री. अक्षय साठे यांनी ५०० लिटर पाण्याची टाकी सभेच्या सेवेतील सर्व साधकांसाठी सेवा म्हणून एक दिवस उपलब्ध करून दिली.’
– कु. वर्षा जेवळे, सोलापूर
५. धर्मप्रेमींनी सभेला जाणार्या जिज्ञासूंसाठी वाहनांचे नियोजन करणे
५ अ. कुमठा नाका येथील महिलांना सभेसाठी जातांना वाहनाची अडचण आल्यावर एका महिलेने पुढाकार घेऊन पर्यायी वाहनाची व्यवस्था करणे : ‘कुमठा नाका येथे ‘ओम शांती’ गटाच्या महिलांची बैठक झाली. त्यांचे सभेला जाण्याचे नियोजनही झाले; परंतु सभेच्या २ दिवस आधी ज्यांच्या मालकीचे चारचाकी वाहन होते, त्यांच्या भावाचे निधन झाले आणि गाडी रहित झाली. त्यामुळे सभेला ३ – ४ जणच यायला सिद्ध झाले होते. एका महिलेने पुढाकार घेऊन पर्यायी वाहनाची व्यवस्था करून १० महिलांना सभेसाठी आणले.’ – कु. रश्मी चाळके, सोलापूर
५ आ. अक्कलकोट रोड येथील शाळेच्या मुख्याध्यापकांनी वाहनांचे नियोजन करणे : अक्कलकोट रोड येथील एका गावात बैठक घेतल्यावर तेथील शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वतःहून पुढाकार घेतला. त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘तुम्ही अधिकाधिक महिलांना सभेला येण्यासाठी सिद्ध करा. मी गाड्यांचे नियोजन करतो.’’ त्यामुळे ४० महिलांना सभेला येता आले.’ – श्री. मिनेश पुजारे, सोलापूर
५ इ. एका कारखान्याच्या मालकांनी त्यांच्या कारखान्यातील कामगारांना सभेला जाता येण्यासाठी वाहनांची व्यवस्था करणे आणि वाहनांना लावण्यासाठी झेंड्यांची मागणी करणे : ‘आम्ही सभेच्या प्रचारासाठी एका कारखान्यात गेलो होतो. मी मालकांना सांगितले, ‘‘आम्ही ‘हिंदु जनजागृती समिती’कडून आलो आहोत.’’ तेव्हा ते आम्हाला म्हणाले, ‘‘मी सर्व कामगारांना एकत्र करतो. तुम्ही सभेचा विषय सर्वांना सांगा. सर्व कामगार येतील. मी त्यांच्यासाठी वाहनांची व्यवस्था करतो. तुम्ही आमच्या वाहनांना लावण्यासाठी झेंडे द्या.’’ ते मालकही सभेविषयी कामगारांना सांगत होते. असाच सकारात्मक अनुभव अन्य कारखान्यांतही आला. कामगार मोठ्या संख्येने सभेसाठी आले.’ – सौ. सोनल कोठावळे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सोलापूर
(क्रमशः)
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ८.१.२०२४)