सांगली आणि मिरज येथील नदी अन् तलाव येथे गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याला भक्तांचा प्रतिसाद !
सांगली, १८ सप्टेंबर (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने कृष्णा नदीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन न करता महापालिकेने सिद्ध केलेल्या जलकुंडात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन आणि मूर्तीदान करण्याचे आवाहन केले होते; मात्र या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता लावत भक्तांनी पारंपरिक आणि शास्त्रीय पद्धतीने सांगली अन् मिरज येथील कृष्णा घाट आणि मिरज येथील गणेश तलाव येथे ५ व्या, ७ व्या आणि ९ व्या दिवशी एकूण ३० सहस्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले आहे.
५ व्या, ७ व्या आणि ९ व्या दिवशी महापालिकेच्या कृत्रिम जलकुंडात ८ सहस्र ९२१ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले, तर या तिन्ही दिवशी ८४२ श्री गणेशमूर्ती महापालिकेकडे दान करण्यात आल्या आहेत. या वेळी महापालिकेच्या मूर्तीदान आणि जलकुंडात मूर्ती विसर्जन करण्याच्या मोहिमेचा फज्जा उडाला आहे. सांगली आणि मिरज येथील कृष्णा घाटावर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी बोटी, होड्या ठेवण्यात आल्या होत्या. नदीवर २४ घंटे आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली होती. महापालिकेने कृष्णा घाट आणि गणेश तलावातून ७९ सहस्र ४७७ किलो निर्माल्य गोळा केले आहे.