पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहिमे’ची यशस्वी सांगता !

भाविकांचा वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याकडे कल !

पुणे येथे घाटावर प्रबोधनात्मक फलक घेतलेले समितीचे कार्यकर्ते

पुणे येथे घाटावर प्रबोधनात्मक फलक घेतलेले समितीचे कार्यकर्तेपुणे १८ सप्टेंबर (वार्ता.) –  श्री गणेशचतुर्थी ते अनंत चतुर्दशी अशा १० दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता १७ सप्टेंबरला गणेशमूर्तीच्या विसर्जनाने झाली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणेच यंदाही एस्.एम्. जोशी पूल, ओंकारेश्वर पूल, तसेच वृद्धेश्वर सिद्धेश्वर घाट येथे श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी जनजागृती केली. विविध प्रबोधनात्मक फलक हातात धरून हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते तीनही विसर्जन घाटांवर थांबले होते. हे फलक भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.

सकारात्मक प्रतिसाद

१. वरील तीनही घाटांवर हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते हातात प्रबोधनात्मक फलक धरून उभे असतांना गणेशभक्तांनी ‘फलकांवरील लिखाण एकदम योग्य आहे’, असा सकारात्मक प्रतिसाद दिला.

२. कार्यकर्त्यांनी हातात धरलेल्या फलकांवरील लिखाण अनेक भाविक मूर्ती विसर्जन करतांना वाचत होते.

३. ‘मागील वर्षी हौदामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन केले होते; मात्र दुसर्‍या दिवशी येऊन पाहिले असता गणपतीच्या मूर्ती भंग झालेल्या अवस्थेत पाहिल्यावर आम्हाला वाईट वाटले. त्यामुळे या वर्षी आम्ही धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात गणेशमूर्तीचे विसर्जन केले आहे’, अशी प्रतिक्रिया एका धर्मप्रेमीने दिली.

महापालिकेने कितीही धर्मद्रोही कृती करून भाविकांना गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, तरीही यंदा वहात्या पाण्यातच मूर्तीचे विसर्जन करण्याकडे भाविकांचा कल दिसून येत होता. तिन्ही घाटांवर अशीच स्थिती पहायला मिळाली.

विसर्जनाविषयी महापालिका प्रशासनाचे औदासिन्य

१. एस्.एम्. जोशी पुलावर भाविकांनी नदीपात्रात गणेशमूर्तीचे विसर्जन करू नये, म्हणून नदीपात्रात जाणार्‍या रस्त्यावर दिव्यांची व्यवस्थाही केलेली नव्हती.

२. नदीपात्राकडे जाणारा मार्ग बांबू आणि पडदा लावून बंद केला होता; मात्र अशाही स्थितीत नदीपात्राकडे जाणार्‍या छोट्याशा जागेतून भाविकांनी नदीपात्रातच गणेशमूर्ती विसर्जित करण्याला प्राधान्य दिले.

३. महापालिकेने गणेशमूर्तीचे पूजन करण्यासाठी केवळ विसर्जन हौदांवर पटलाची व्यवस्था केली होती. नदीपात्रात जाणार्‍या रस्त्यावर आरती आणि पूजन करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने भक्तांना गणेशमूर्ती खाली ठेवून पूजन करावे लागत होते. ‘हौदात गणेशमूर्तीचे विसर्जन करणार नसाल, तर घाटावर जाऊन कुठेही मूर्ती ठेवून पूजन करा. विसर्जन हौदाजवळ ठेवलेल्या पटलांवर करू नका’, अशा प्रकारचे दादागिरी करणारे वक्तव्य महापालिका कर्मचार्‍यांकडून ओंकारेश्वर पूल येथे ऐकायला मिळत होते.

४. ‘खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग केल्यामुळे नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन नदीपात्रात न करता विसर्जन घाटांवर असलेल्या हौदांत करावे’, अशी उद्घोषणा महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत होती.

पिंपरी -चिंचवड महापालिकेची धर्मद्रोही कृती !

पिंपरी चिंचवड – येथे बहुतेक सर्वच ठिकाणी कृत्रिम हौदात विसर्जन करण्यविना दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने गणेशभक्तांना अखेर हौदातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे लागत होते. बिर्ला घाट, जिजाऊ पर्यटन केंद्र विसर्जन घाट, वाल्हेकर वाडी येथील घाट, गणेश तलाव प्राधिकरण, केशवनगर चिंचवड, मोरया घाट चिंचवड या आणि अशा अनेक घाटांवर नदीपात्रात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास बंदी होती. संपूर्ण घाट बांबू, लोखंडी पाईप लावून बंद केल्याने आणि त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्याने कोणत्याही भाविकांना थेट नदीपात्रात मूर्तीचे विसर्जन करता आले नाही. सर्वच घाटांवर भाविकांची पुष्कळ मोठी गर्दी होती; मात्र त्याहूनही अधिक गर्दी ही वेगवेगळ्या आस्थपनांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. त्यामध्ये निर्माल्य जमा करणे, हौदात तीन वेळा बुडवल्यावर त्वरितच मूर्ती कह्यात घेणे यांसाठी जणू चढाओढ चालू असल्याचे चित्र दिसून आले.

भोळ्या भाविकांना या प्रकारे विसर्जन करण्यास भाग पाडून पिंपरी-चिंचवड महापालिकेने धर्मद्रोही कृत्य केल्याची चर्चा आहे.

वाल्हेकर वाडी, चिंचवड बिर्ला घाट, जिजाऊ पर्यटन केंद्र येथील घाट, मोरया घाट या ठिकाणी काही मूर्ती अस्ताव्यस्त ठेवल्या होत्या. कह्यात घेतलेल्या मूर्ती लगेचच भाविकांच्या समोर ट्रकमध्ये भरल्या जात होत्या. बर्‍याच ठिकाणी हौदात असलेले पाणी अतिशय खराब झाले होते; मात्र त्या पाण्यामध्येच गणेशमूर्तीचे विसर्जन महापालिकेचे कर्मचारी करत होते. केवळ प्रदूषण होऊ नये, असे कारण देत महापालिकेने हा तथाकथित पर्यावरणपूरक उपक्रम राबवला.
पुणे येथे घाटावर प्रबोधनात्मक फलक घेतलेले समितीचे कार्यकर्ते

पिंपरी-चिंचवड येथील बांबू लावून बंद केलेले घाट