प्राचीन काळी युद्ध लढण्यासाठी पक्ष किंवा विरोधी पक्ष विविध व्यूहरचना रचत असत. आपण महाभारतात केवळ चक्रव्यूहाविषयीच ऐकले असेल; परंतु या युद्धात अनेक प्रकारच्या व्यूहरचना केल्याचा उल्लेख आढळतो. अशा १० मुख्य रचनांविषयी माहिती पाहूया.
१. गरुडव्यूह
युद्धात सैनिकांना विरुद्ध सैन्यासमोर अशा प्रकारे उभे केले जाते की, आकाशातून पाहिल्यावर त्याचा आकार गरुड पक्षासारखा दिसतो. यालाच ‘गरुडव्यूह’ म्हणतात. महाभारतात या व्यूहाची रचना भीष्म पितामह यांनी केली होती.
२. क्रौंचव्यूह
क्रौंच ही सारस पक्षाची एक प्रजाती आहे. या व्यूहाचा आकार क्रौंच पक्ष्यासारखा असतो. महाभारतात ही व्यूहरचना युधिष्ठिराने रचली होती.
३. अर्धचंद्राकारव्यूह
अर्धचंद्राचा अर्थ आपल्याला ठाऊकच (हाकलून देणे) आहे. सैन्याची रचना जेव्हा अर्ध्या चंद्रासारखी असते, तेव्हा त्याला ‘अर्धचंद्राकार व्यूह’, असे म्हणतात. ही व्यूहरचना अर्जुनाने कौरवांच्या गरुड व्यूहाला प्रत्युत्तर देण्यासाठी केली होती.
४. चक्रव्यूह
सैन्यरचना आकाशातून पाहिल्यावर फिरत्या चक्रासारखी दिसते. हे चक्रव्यूह पाहिल्यावर आत जायला तर रस्ता आहे; पण बाहेर पडायला रस्ता नाही. आपण गुंडाळलेली स्प्रिंगसारखी तार पाहिली असेल, अगदी तसेच हे असते. महाभारतात ही व्यूहरचना गुरु द्रोणाचार्य यांनी केली होती.
५. मंडलाकारव्यूह
मंडलाचा अर्थ वर्तुळाकार किंवा चक्राकार असा होतो. महाभारतात मंडलाकार व्यूहाची रचना भीष्म पितामह यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून पांडवांनी व्रजव्यूहाची रचना करून त्याला भेदले होते.
६. वज्रव्यूह
वज्र हे एक प्रकारचे शस्त्र आहे. ते कुलिश आणि अशानी अशा दोन प्रकारचे असते. त्याचे वरचे तीन भाग तिरपे वाकले असतात. मधला भाग पातळ असतो; पण हे पुष्कळ भारी असते. त्याचा आकार इंद्राच्या वज्रासारखा दिसतो. महाभारतात ही व्यूहरचना अर्जुनाने केली होती.
७. कासवव्यूह
यामध्ये कासवाप्रमाणे सैन्याची मांडणी केली जाते.
८. औरमीव्यूह
पांडवांच्या व्रजव्यूह रचनेला प्रत्युत्तर देण्यासाठी भीष्माने औरमी व्यूहरचना केली होती. या व्यूहामध्ये संपूर्ण सैन्य समुद्राप्रमाणे सजवले जात होते. ज्याप्रकारे समुद्रात लाटा दिसतात, अगदी त्याच आकारात कौरव सैन्याने पांडवांवर आक्रमण केले होते.
९. श्रीन्गातकाव्यूह
कौरवांच्या औरमी व्यूहरचनेच्या प्रत्युत्तरासाठी अर्जुनाने श्रीन्गातका व्यूहरचनेची निर्मिती केली होती. हा व्यूह एखाद्या इमारतीसारखा दिसत होता. कदाचित यालाच ३ शिखर असलेली व्यूहरचना म्हटली जात असेल. याखेरीज सर्वतोभद्र आणि सुपर्ण व्यूहरचनांचाही उल्लेख आढळून येतो.
१०. चक्रशकटव्यूह
महाभारत युद्धात अभिमन्यूच्या निर्घृण हत्येनंतर अर्जुनाने ‘उद्या सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचा वध करीन’, अशी शपथ घेतली होती. तेव्हा गुरु द्रोणाचार्यांनी जयद्रथाचा बचाव करण्यासाठी ही व्यूहरचना केली होती; पण भगवान श्रीकृष्णाच्या चतुराईमुळे जयद्रथ या व्यूहरचनेतून बाहेर आला आणि मारला गेला.
– श्री. जितेंद्र शर्मा, इंदूर, मध्यप्रदेश.
(साभार : श्री. जितेंद्र शर्मा यांच्या ‘एक्स’ खात्यावरून)