चैतन्याच्या स्तरावर साधकांमध्ये आनंद आणि उत्साह निर्माण करणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

१. ‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने वागणे

‘सद्गुरु राजेंद्र शिंदे जेव्हा देवद (पनवेल) येथील आश्रमातील भोजनकक्षात येतात, तेव्हा तेथील पटलावर पेले, ताटे किंवा वाट्या नसतील, तर ते लगेच ती भांडी आणून ठेवतात. ते आश्रमात अनावश्यक चालू असलेले दिवे बंद करतात आणि जेथे आवश्यक आहे, तेथील दिवे लावतात.

२. साधिकेच्या हाताच्या बोटाची व्याधी उणावण्यासाठी तिला नामजपादी उपाय सांगणे आणि तिला उपाय शोधण्यास शिकवून स्वयंपूर्ण बनवणे 

माझ्या हाताच्या एका बोटाचे शस्त्रकर्म झाले होते. बोटाची व्याधी उणावण्यासाठी पुष्कळ वेळ लागत होता. सद्गुरु राजेंद्रदादांनी बोटाची व्याधी बरी होण्यासाठी नामजपादी उपाय शोधून दिले आणि मला ‘उपाय कसे शोधायचे ?’, हेही शिकवले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही उपाय शोधा आणि ‘योग्य आहे का ?’, हे पडताळण्यासाठी मला कळवा.’’ त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृती करून उपाय अचूक शोधता आल्याने मला पुष्कळ आनंद झाला. आयुर्वेदीय औषध आणि सद्गुरु दादांनी सांगितलेले उपाय यांमुळे माझे बोट पूर्ण बरे झाले.

३. आध्यात्मिक स्तरावरील त्रास असणार्‍या साधकांना साहाय्य करणे

आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांकडे सद्गुरु राजेंद्रदादांचे लक्ष असते. सद्गुरु दादा त्यांना सर्वतोपरी साहाय्य करतात. एक साधिका नामजपादी उपायांना बसली होती; पण ती इकडेतिकडे बघत होती. तेव्हा सद्गुरु दादांनी तिला हाताच्या बोटांची मुद्रा करून नामजप करण्याचा निरोप पाठवला आणि तिची उपायांतील सतर्कता वाढवली, तसेच तिचा नामजपातील वेळ वाया जाऊ दिला नाही.

४. सद्गुरु राजेंद्रदादांच्या सहवासात आणि त्यांची आठवण केल्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होणे

अ. एकदा मला आध्यात्मिक त्रास होत होता. सद्गुरु दादा भोजनकक्षात अल्पाहार करत होते. मी त्यांच्या शेजारी बसले. काही वेळाने माझ्यावरील त्रासदायक आवरण न्यून झाले आणि ‘माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होत आहेत’, असे मला जाणवले. नंतर मला आनंदाने सेवा करता आली. त्या वेळी मला वाटले, ‘देवाने सद्गुरु दादांच्या माध्यमातून मला आधीच ऊर्जा पुरवली आणि माझ्याकडून सेवा करून घेतली.’

आ. एकदा मी नामजपादी उपायांना बसले होते. तेव्हा मी माझ्याच विचारांत होते. त्या वेळी ‘सद्गुरु दादांचे माझ्याकडे लक्ष आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर ‘त्यांच्याकडून तेजोमय असे काहीतरी माझ्या दिशेने आले आणि माझ्यातून काहीतरी निघून गेले’, असे मला जाणवले आणि माझा उत्साह वाढला अन् माझे उपाय चांगले झाले.

इ. मी नामजपादी उपायांसाठी प.पू. भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या गाडीजवळ बसले होते. सद्गुरु राजेंद्रदादा तेथील परिसरात फेर्‍या मारत होते. तेव्हा त्यांच्याकडून येणार्‍या चैतन्यलहरींमुळे माझे मन नामजपात पुष्कळ एकाग्र झाले. मी काही वेळ भावस्थिती अनुभवली. माझी ही स्थिती बराच वेळ टिकून होती.

ई. एका साधिकेला पुष्कळ शारीरिक त्रास होत होता. तिचा असा भाव होता की, सद्गुरु दादांना तिच्या त्रासाविषयी सांगितल्यावर तिचा त्रास न्यून होईल आणि तसेच झाले. तिने सद्गुरु दादांना तिला होणारा त्रास सांगितला आणि ती पूर्ण बरी झाली. त्यानंतरही याविषयीची आठवण होऊन तिचा भाव जागृत होत होता.

५. सद्गुरु राजेंद्रदादांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

अ. सद्गुरु राजेंद्रदादा स्वयंपाकघरात येऊन तेथे सेवा करणार्‍या साधकांशी बोलतात आणि त्यांना हसवतात. त्या वेळी ‘ते साधकांना पुष्कळ शक्ती आणि ऊर्जा देतात’, असे मला जाणवले. त्यांच्या वाणीतील चैतन्यामुळे साधकांच्या मनाला आलेली मरगळ निघून जाते आणि त्यांचा उत्साह वाढतो.

आ. ते बालसाधकांमध्ये असतांना त्यांच्याशी समरस होऊन जातात. त्या वेळी सद्गुरु दादांचे निरागस हसणे आणि बोलणे पाहून श्रीकृष्णस्वरूप मला प.पू. गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) आठवण येते.

इ. सद्गुरु दादा सात्त्विक पोषाख परिधान करतात. एकदा त्यांनी पोपटी रंगाचा झब्बा, धोतर आणि शेला परिधान केला होता, तेव्हा ते मला प्रभु श्रीरामासारखे दिसत होते.

ई. सद्गुरु दादांच्या केवळ दर्शनाने मला ईश्वरी तत्त्वाची अनुभूती येते. त्या वेळी माझे मन वेगळ्याच स्थितीत जाते अन् ‘त्यांचे चैतन्य सतत अनुभवत रहावे’, असे मला वाटते.’

– कु. मनीषा शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.१२.२०२२)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक