पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गोवंशियांची सद्यःस्थिती, अथर्ववेद आणि ऋग्वेद यांतील गोमाहात्म्य, गायीचे महत्त्व अधोरेखित करणारे काही वैशिष्ट्यपूर्ण संदर्भ अन् पंचगव्य, गायीच्या शेणाचे महत्त्व, गायीच्या दुधाचे विविध उपयोग, नकली तूप अन् गायीचा अनादर, गोभक्ती, परदेशाला मांस निर्यात करणारा ‘भारत’ हा एकमेव देश, गोरक्षण अन् गोसंवर्धन यांचे महत्त्व’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
लेखांक क्र. ४८ वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/831538.html
(लेखांक ४९)
२१. पाश्चात्त्य आणि भारतीय गायी !
विशेष म्हणजे पाश्चात्त्य गायींच्या दुधापेक्षा स्निग्धांश भारतीय गायींच्या दुधात अधिक असतो. भारतीय गाय जशी वासरावर प्रेम करते, तसे पाश्चात्त्य गायीचे नसते. ती अन्नदात्या मालकावर अधिक प्रेम करते. तिला पालटत्या हवामानामुळे किंवा संसर्गाने लवकर रोग होतात. त्यामानाने भारतीय गुरे निरोगी असतात. पालटत्या हवामानाला ती उत्तम टक्कर देऊ शकतात. भारतीय गायी त्या त्या प्रदेशाच्या वातावरणानुसार विविध जाती-गुणधर्मांच्या असतात. कोकणातील गायी लहान आकाराच्या आणि गीर, कृष्णाकाठी, काठेवाडी इत्यादी गायी भव्य आकाराच्या, डौलदार शिंगांच्या असतात. कोल्हापूर-सांगली भागातील सुंदर, समान अंगांच्या, समान शिंगांच्या, उभट चेहर्याच्या आणि जगातील अत्यंत सुंदर खिलारी गायी हे भारताचे वैभव आहे. असे गोवंश उत्तम प्रकारे जतन करून त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करावा.
२२. गायीवरील बलात्कार दुर्दैवी !
पाश्चात्त्य वळूंचे वीर्य भारतीय गायीच्या गर्भात ढकलून अनैसर्गिकरित्या कृत्रिम गर्भधारणा करवणे, हा गायीवर बलात्कार आहे. अशा प्रकारच्या कृत्रिम बीजारोपणाने तिला नैसर्गिक आणि ईश्वरदत्त मैथुनाच्या सुखालाही मनुष्याने पारखे केले आहे. हा मोठा अत्याचार आहे. भारतीय गायीच्या पोटी पाश्चात्त्य प्रजा उत्पन्न करून तात्कालिक दुधाचे प्रमाण वाढवण्याचा लाभ होत असेलही; पण ‘उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १, श्लोक ४३) म्हणजे ‘शाश्वत (परंपरागत) जातीधर्म आणि कुळधर्म उद्ध्वस्त होतात.’ ही संकरामुळे होणारी हानी कुणी लक्षात घेत नाही. एकदा नष्ट झालेले कुळधर्म, म्हणजे आनुवंशिक गुणधर्म संकराने कायमचे नष्ट होतात.
२३. गोमातेची काळजी कशी घ्यावी ?
गायींना उत्तम आहार द्यावा. हिरवागार चारा, पेंड, सरकी इत्यादींमुळे गायीचे दूध वाढेल. दुधाचा कस वाढेल. एक अपत्य झाल्यावर निदान ३ मास तरी तिला गर्भधारणा होऊ नये, याची काळजी घ्यावी. दूध वेळच्या वेळी काढण्यात यावे, गायीच्या वासराला दुधात त्याचा जन्मसिद्ध हक्क द्यावा. गुरांना चरण्यासाठी पुष्कळ भूमी राखून ठेवावी. तेथे अत्यंत पोषक जातीच्या वनस्पतींची लागवड करावी आणि त्यांची जपणूक करावी. गोशाळा स्वच्छ, विस्तृत आणि शास्त्रीय पद्धतीने बांधाव्यात. बैलांसाठी स्वतंत्र गोठा ठेवावा. वासरांना स्वतंत्र ठेवावे. गवत यंत्राने बारीक साकटून घालावे. गव्हाळ्या स्वच्छ ठेवाव्यात. गायींना रानात मुक्त हुंदडू द्यावे. गोशाळेतून शेण आणि गोमूत्र यांचा निचरा व्यवस्थित करावा. शेणापासून गोवर्या आणि खत बनवावे. गोबरगॅस सिद्ध करवून त्याचा लाभ निदान गोशाळांमध्ये दिवाबत्तीसाठी आणि परिसरातल्या लोकांना स्वयंपाकासाठी करून द्यावा. केवळ शेणापासून उत्पादन करण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करावा. उत्तम बैल परिपुष्ट करून शेतीसाठी वापरावेत. शेतकर्यांना विकावेत.
भाकड गुरांचा विभाग स्वतंत्र असावा. त्यांनाही अन्न पुष्कळ द्यावे. त्यांच्या शेणापासून वरीलप्रमाणेच खते, गॅस, गोवर्या बनवून घ्याव्यात. तो विभागही स्वयंपूर्ण व्हायला हवा.
गोसंवर्धन खाते अगदी स्वतंत्र असावे. तालुक्यात २ – ३ तरी पांजरपोळ भाकड गुरांसाठी चालवावेत. लोकांनी आपली गुरे भाकड झाल्यावर पशूवधगृहात न पाठवता पांजरपोळात पाठवावी. गुरे पांजरपोळात मृत्यू पावल्यावर त्यांना पशूवधगृहात नेण्यात यावे. तेथे त्यांचे चामडे काढून कमावणे, तसेच शिंगे, हाडे, मांस इत्यादी वेगळे करून स्वच्छ करणे अन् संबंधित व्यावसायिकांना ते विकणे, हा उद्योग करावा. गायी, वासरे आणि बैल केव्हाही मारण्यात येणार नाहीत, अशी ही राष्ट्रीय व्यवस्था हवी.
२४. राजा दिलीप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची गोसेवा !
राजा दिलीपने गोसेवा केल्याचे सुंदर वर्णन ‘रघुवंश’ या काव्यात कालिदासांनी केले आहे. प्राचीन भारतीय साहित्यात ‘गोपालन’ आणि ‘गोसेवा’ हा मोठा महत्त्वाचा विषय असे. गाय हा हिंदु जीवनाचा अविभाज्य भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणी गायीला कापणार्या कसायाचा हात तोडून टाकला होता. त्यांनी छत्रपती झाल्यावर ‘गोब्राह्मण प्रतिपालक’, असे बिरुद स्वतःला लावून घेतले. गायीकडे उपयुक्त पशू या भावनेने पहाण्यापेक्षा ‘गोमाता’ म्हणून आपले राष्ट्रीय वैशिष्ट्य या दृष्टीने पाहिले पाहिजे.
(क्रमश:)
– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
संपादकीय भूमिकागायी, वासरे आणि बैल यांना केव्हाही मारण्यात येणार नाही, अशी राष्ट्रीय व्यवस्था ‘हिंदु राष्ट्रा’त असेल ! |
गोमातेविषयी केलेले पदमाझी आई (दिवंगत) श्रीमती ताराबाई शेवडे हिने गोमातेविषयी पूर्वी केलेले पद येथे देत आहे. वाचवा गोमातेची मान । दूध, दही, घृत जी राष्ट्राला । हिंदूंनी सर्वस्व रक्षिले । – पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे |