एस्.टी. महामंडळाकडून परतीच्या प्रवासासाठीही नियोजन
मुंबई – कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव ! या उत्सवासाठी कोकणात लाखो गणेशभक्त येत असतात. खासगी वाहने, रेल्वे यांसह राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांतूनही मोठ्या प्रमाणात हे गणेशभक्त कोकणात येतात. यावर्षी मुंबई, ठाणे, पालघर यांसह अन्य शहरांतून जवळपास अडीच लाखांहून अधिक गणेशभक्त गेल्या ५ दिवसांत कोकणात आले आहेत.
यावर्षी ५ सहस्रांहून अधिक बसगाड्या एस्.टी. महामंडळाने सोडल्या होत्या. ३ ते ८ सप्टेंबर या कालावधीत विविध अडचणींवर मात करत एस्.टी. प्रशासनाने या गाड्यांतून अडीच लाखांहून अधिक प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे. यासाठी राज्यभरातील विविध आगारांतून आलेले १० सहस्रांहून अधिक चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात किरकोळ अपघात वगळता ही सेवा सूरळीत पार पाडली. आता १२ ते १७ सप्टेंबर या कालावधीत गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी एस्.टी. महामंडळाच्या कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या विभागांतील आगारातून गट आरक्षण आणि व्यक्तीगत आरक्षण यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकेदेखील तैनात करण्यात आली होती. नादुरुस्त बसगाड्यांना पर्याय म्हणून चिपळूण, महाड आणि माणगाव या आगारांत १०० बसगाड्या तैनात ठेवण्यात आल्या होत्या, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली आहे.