देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील चैतन्यमूर्ती सद्गुरु राजेंद्र शिंदे !

‘भाद्रपद शुक्ल षष्ठी (९.९.२०२४) या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा ६२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या खोलीत तिला जाणवलेले पालट आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी म्हटलेली प्रार्थना ऐकतांना तिला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

१. गुणवैशिष्ट्ये

१ अ. कृतज्ञताभाव : ‘सद्गुरु राजेंद्रदादांच्या मनात गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञताभाव आहे. त्यांना आश्रम आणि आश्रमातील प्रत्येक वस्तू यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.

१ आ. प्रेमभाव : त्यांना साधकांविषयी आपुलकी आणि प्रेम आहे. रामनाथी आश्रमातून साधक देवद आश्रमात सेवेसाठी आल्यावर त्या साधकांना भेटल्यावर सद्गुरु दादांना पुष्कळ आनंद होतो. ‘साधकांचा आनंद, तोच सद्गुरु दादांचा आनंद आहे’, असे मला वाटते.

१ इ. इतरांचा विचार करणे : देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाचे नूतनीकरण होणार होते, तेव्हा सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे साहित्य दुसर्‍या खोलीत न्यायचे होते. त्यांना साहाय्य करण्यासाठी २ साधक येणार होते. त्या साधकांची सकाळी अल्पाहार बनवण्याची सेवा असल्याने ते साधक १० वाजता सद्गुरु दादांच्या खोलीत येणार होते. सद्गुरु दादांनी ते साधक येईपर्यंत कपाटातील बरेचसे साहित्य बाहेर काढले. सद्गुरु दादांना पाठदुखीचा त्रास आहे, तरीही त्यांनी शक्य होईल तेवढे साहित्य उचलले.

१ ई. सद्गुरु दादांचा चेहरा अधिक तेजस्वी झाला आहे.

१ उ. ‘सद्गुरु राजेंद्रदादांकडे पाहून प.पू. गुरुदेवच आले आहेत’, असे मला जाणवते.

कु. दीपाली माळी

२. सद्गुरु राजेंद्रदादांच्या खोलीत जाणवलेले पालट

अ. त्यांच्या खोलीत मला पुष्कळ प्रमाणात पांढरा प्रकाश दिसतो.

आ. त्यांच्या खोलीत पोकळी जाणवते. ‘खोली तरंगत आहे’, असे मला जाणवते.

इ. त्यांच्या खोलीतील प्रत्येक वस्तू चैतन्यमय झाली आहे. त्या वस्तूंना ‘सद्गुरु दादांचा सहवास लाभतो’, यासाठी पुष्कळ कृतज्ञता वाटते, असे जाणवते. ‘आम्ही केवळ सद्गुरूंच्या हस्तस्पर्शाने धन्य धन्य झालो आहोत. आता आम्हाला दुसरे काहीच नको’, असे त्यांच्या खोलीतील वस्तूंना वाटते. ‘सद्गुरूंच्या वास्तव्याने आणि त्यांच्या चैतन्याने त्या वस्तू सूक्ष्मातून काहीतरी सांगत आहेत’, असे मला जाणवते.

ई. खोलीतील लादी जणू म्हणते, ‘मी किती भाग्यवान आहे ! मी लादी असल्यामुळे मला सतत भगवंताच्या चरणांचा स्पर्श होत असतो. मला भगवंताप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते. मी धन्य धन्य झाले आहे.’

उ. खोलीतील पटल जणू म्हणते, ‘जेथे भगवंत वास्तव्य करतो, तेथे केवळ गुरुकृपेने मला रहाण्याची संधी लाभली.’ ‘त्या पटलामध्ये लीनभाव आहे’, असे मला जाणवते.

ऊ. खोलीतील मोरपीस जणू म्हणते, ‘सद्गुरु दादा स्वतःच्या लहानशा कृतीतूनही इतरांना आनंद देतात, तसा आनंद मला इतरांना देता यावा’, यासाठी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते.’

ए. ‘सद्गुरु दादांच्या खोलीतील प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र जिवंत झाले आहे’, असे मला जाणवते.

ऐ. सद्गुरु दादांच्या खोलीत गेल्यावर ‘प.पू. गुरुदेवांच्या खोलीत गेले आहे’, असे मला वाटते.

३. सद्गुरु दादांनी केलेली प्रार्थना ऐकत असतांना आलेली अनुभूती

३ अ. मन अस्वस्थ झाले असतांना भ्रमणभाषवर ध्वनीमुद्रित केलेली सद्गुरु राजेंद्रदादांनी केलेली प्रार्थना ऐकतांना सूक्ष्मातून दृश्य दिसून श्रीविष्णूचे (प.पू. गुरुदेवांचे) विराट रूप दिसणे : एकदा माझे मन फार अस्वस्थ झाले होते. मी नामजपादी उपाय करत होते. मी भ्रमणभाषवर ध्वनीमुद्रित केलेली सद्गुरु दादांनी म्हटलेली ‘हे श्रीकृष्णा, मी तुला संपूर्णपणे शरण आलो आहे…’, ही प्रार्थना ऐकत होते. त्या वेळी मला सूक्ष्मातून दिसले, ‘ब्रह्मांडात पोकळी आहे. प्रार्थनेचा आवाज ब्रह्मांडात घुमत आहे. ब्रह्मांडात श्रीविष्णूचे (प.पू. गुरुदेवांचे) विराट रूप दिसत आहे. सद्गुरु दादा गुरुमाऊलींच्या चरणी संपूर्णपणे शरण जाऊन प्रार्थना करत आहेत. ते व्याकुळ होऊन भगवंताला आळवत आहेत. त्यांच्या प्रत्येक शब्दात आर्तता जाणवत आहे. त्यामुळे साक्षात् भगवंत अवतरला आहे आणि त्यांच्यावर प्रसन्न झाला आहे.’

३ आ. ही प्रार्थना ऐकल्यावर मला हलकेपणा जाणवला आणि माझ्यात उत्साह निर्माण झाला.

‘गुरुमाऊली, आपल्याच अपार कृपेमुळे सद्गुरु दादांच्या संदर्भात मला ही सूत्रे जाणवली’, त्यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. दीपाली राजेंद्र माळी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.३.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक