संपादकीय : हिंदु मैतेयी संकटात !

कुकी समुदाया विरुद्ध मैतेयी समुदायाच्या लोकांनी काढलेला विशाल मोर्चा

मणीपूरमध्ये कौथ्रूक गावात ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांकडून हिंदु मैतेयी समाजावर अत्याधुनिक ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले. यामध्ये एका हिंदु महिलेचा मृत्यू झाला आणि तिची मुलगी घायाळ झाली. अन्य एके ठिकाणी मंडपात पूजा करणार्‍या हिंदु मैतेयी समाजाच्या व्यक्तीची हत्या करण्याची घटना घडली आहे. येथेही हत्या करणारे ख्रिस्ती कुकीच होते. कुकी आणि मैतेयी यांच्यातील संघर्ष गत काही वर्षांपासून भयावह पद्धतीने चालू आहे. अतिशय तीव्र चालू असलेला संघर्ष काही महिन्यांपूर्वी न्यून झाला, तरी अधूनमधून हिंसाचार उफाळून येत आहे. हा हिंसाचार वादावादी, भांडण किंवा किरकोळ अथवा मोठी हाणामारी येथपर्यंत नसतो, तर आता अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह थेट जीवच घेतला जात आहे. जिहादी आतंकवादाचे स्वरूप अनेक प्रकारांत असले, तरी मुख्य म्हणजे अत्याधुनिक रायफल, बाँब, ग्रेनेड यांद्वारे ते भारतीय आणि भारतीय सैन्य यांविरुद्ध लढले जाते. ते भारताच्या सीमावर्ती भागात लढले जात असल्याने तेथे सीमा सुरक्षा दल आणि भारतीय सैन्य यांचे सैनिक असतात. दोन्ही बाजूंकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असल्याने ते युद्ध म्हणून लढले जाते. यात कधी आतंकवादी ठार होतात, तर कधी सैनिकांना वीरमरण येते. जेव्हा केवळ एकाच बाजूकडे अत्याधुनिक शस्त्रे असतील आणि दुसर्‍या बाजूकडे काहीच शस्त्रास्त्रे नसतील, तेव्हा काय परिस्थिती होईल ? तर शस्त्रास्त्रे नसलेले सातत्याने मारले जातील आणि तेच सध्या मणीपूर येथे होतांना दिसत आहे.

मैतेयींमध्ये भीतीचे वातावरण

मणीपूरमध्ये कुकी आणि मैतेयी यांच्यात संघर्ष चालू झाल्यावर कुकींच्या हातात लोखंडी रॉड, हॉकी स्टिक्स, मोठ्या काठ्या इत्यादी साधने दिसायचीच, तर काहींच्या हातात बंदुका, रायफलीसुद्धा दिसायच्या. यामध्ये सामान्य कुकी आणि आतंकवादी कुकी कोण ? हेसुद्धा लक्षात येणार नाही, एवढे साम्य होते. ते जेव्हा एखाद्या हिंदु मैतेयी गटावर आक्रमण करत, तेव्हा मैतेयींना प्रतिकाराची संधीच मिळत नव्हती; मात्र मैतेयी गट काही ना काही करून प्रतिकार करायचे आणि आक्रमण थोपवायचे. आता मात्र ते कठीण झाले आहे; कारण ड्रोनद्वारे आक्रमण करण्याची त्यांच्याकडे ही पहिलीच वेळ आहे. ड्रोनद्वारे बाँब फेकणे, हा मोठ्या आतंकवादी कटाचा भाग आहे. यामुळे साहजिकच कौथ्रूक गावातील मैतेयींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आणि आसपासच्या गावांतील ग्रामस्थ कुकी आतंकवाद्यांच्या आक्रमणांमुळे बर्‍याच काळापासून विस्थापितांच्या छावण्यांमध्ये रहात आहेत. काही जण नेहमीचे आयुष्य जगण्यास काही दिवसांपासून प्रारंभ होतो न होतो, तोच हे नव्याने आक्रमण झाले आहे. यामुळे पुन्हा १५० हून अधिक ग्रामस्थांनी स्थानिक शाळेत आश्रय घेतला आहे. सर्वांच्याच चेहर्‍यावर भीती, असुरक्षितता आणि काळजी आहे.

स्वतंत्र कुकी प्रदेशाची मागणी

ख्रिस्ती कुकींनी स्वतंत्र कुकी राज्याची मागणी केली आहे. हा प्रदेश त्यांना मणीपूर, आसाम, नागालँड या राज्यांमधून हवा आहे. वेगळ्या राज्याची मागणी कशाच्या आडून केली जात आहे ? तर कुकी आणि मैतेयी यांच्यात सातत्याने संघर्ष होत असल्याने दोन्ही समाजाला शांततेत नांदता आले पाहिजे, हिंसाचार न्यून झाला पाहिजे, ही कारणे पुढे केली जात आहेत. ‘धर्मांतराने राष्ट्रांतर होते’, हे येथे पुन्हा एकदा सिद्ध झाले. हिंदु मैतेयी समाज खोर्‍यांमध्ये रहाणारा, म्हणजे पठारी भागात; तर कुकी, नागा हे उंच पर्वतांवर वास्तव्य करणारे आहेत. मुळात हिंदु मैतेयींचा समावेश भटक्या जमातींमध्ये करून त्या सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय झाला आणि हिंसाचाराचा आगडोंब उसळला. याला कुकींनी प्रचंड विरोध केला आणि अजूनही करत आहेत. याच्या परिणामस्वरूप झालेल्या संघर्षात प्रतिदिन दोन्ही बाजूंकडील लोक मारले जात असले, तरी कुकींमध्ये असणारे आक्रमक गट हिंदूंना नष्ट करण्याच्या मागे आहेत. कुकी आणि नागा हे लढवय्या अन् भटक्या जमाती आहेत. कुकींचे वास्तव्य नागालँड, मेघालय, आसाम यांच्या पर्वतीय भागात, तसेच शेजारी देश म्यानमारमध्ये आहे. त्या भटक्या जमाती असल्यामुळे त्यांचे एका प्रदेशातून दुसर्‍या प्रदेशात अनेक दशकांपासून सातत्याने फिरणे होत असते. नागा जमातीचेही तसेच असल्याने दोन्ही गटांमध्ये जागा, नैसर्गिक साधन-संपत्ती यांवरून अनेक वेळा संघर्ष झाला आहे. दोघांकडेही लढवय्या सैनिकांचा गट सिद्ध आहे. विशेषत: कुकींना म्यानमारकडून साहाय्य मिळते, तर आता भारत अशांत ठेवण्यासाठी त्यांच्या काही गटांना चीनकडूनही साहाय्य मिळते . परिणामी ते शस्त्रास्त्रदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांच्यात अनेक लढवय्ये गट कार्यरत आहेत आणि त्यातील काही गटांशी केंद्र सरकारने शांतता करारही केले आहेत. ‘आता होत असलेल्या हिंसक संघर्षात हे सशस्त्र गट, म्हणजे कुकी जमातीचे सैनिक कार्यरत असल्यामुळे हिंसाचार अधिक प्रमाणात होत आहे’, असा केंद्र सरकारचा कयास आहे. हे करार कुकी गटाकडून मोडण्यात आले आहेत. या करारांनुसार कुकींच्या सशस्त्र गटाने शस्त्रांचा वापर न करणे अपेक्षित आहे; पण तसे काही होत नाही.

ख्रिस्ती कुकींची लोकसंख्या जी केवळ १-२ टक्के होती, ती आता मणीपूरमध्ये २६ टक्के झाली आहे, तर मैतेयींची ५५ टक्क्यांची लोकसंख्या घटून ४९ टक्के झाली आहे. याचाच अर्थ कुकी समाज रहात असलेल्या मणीपूरच्या पर्वतीय भागांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात विशेषतः दुर्गम भागांमध्ये म्यानमारच्या सीमावर्ती भागातून ये-जा करणे कुकींना सहज जमते. यावर भारतीय सैन्य, पोलीस यांना नियंत्रण ठेवणेही कठीण आहे. यालाच मैतेयी यांचा आक्षेप आहे. त्यांची लोकसंख्या न्यून होत आहे आणि कुकींची लोकसंख्या आश्चर्यकारकरित्या वाढत आहे. कुकींकडे लढणारे आतंकवादी गट आहेत. त्यामुळे मैतेयींना सुरक्षित रहाणे कठीण आहे.

कुकी आतंकवादी खांद्यावरून नेऊ शकतात, अशा बाँब फेकणार्‍या छोट्या तोफा आणि ‘एके ४७’ रायफली अशी शस्त्रास्त्रे समवेत घेऊन जंगलातून फिरत ‘आम्ही मैतेयींना पूर्णपणे नष्ट करू’, असे सांगत असल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यातून ख्रिस्ती कुकींना हिंदु मैतेयींचे अस्तित्वच नको आहे, हे लक्षात येते. मणीपूरचे मुख्यमंत्री तथा भाजपचे बिरेनसिंह हे स्वत: मैतेयी समाजाचे आहेत. त्यामुळे कुकी गटाचा आरोप आहे की, ते पोलिसांकरवी कुकींवर अत्याचार करतात. त्यामुळे त्यांनी त्यागपत्र द्यावे. त्यात आपल्याकडे काँग्रेस नेते राहुल गांधींसारखे उथळ बोलणारे आणि वागणारे नेते या आगीत अधिक तेल ओतण्याचे काम करतात. यापूर्वी काँग्रेसचेच सरकार अधिक काळ तेथे सत्तेत होते. ‘मणीपूरमधील परिस्थिती जाणून न घेता भाजपकडून द्वेष पसरवल्यामुळे नागरी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे’, असे काँग्रेस सांगत आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेत असतांना त्यांनी हा संघर्ष न्यून करण्यासाठी काही प्रयत्न का केले नाहीत ? कुकींना वेगळे राज्य दिले, तर अन्य जमातीही वेगळ्या राज्याची मागणी करतील आणि फुटीरता वाढीस लागेल. तेव्हा केंद्र सरकारने लवकरात लवकर या समस्येवर मार्ग काढून मैतेयी हिंदूंचे रक्षण करणे आवश्यक आहे.

ख्रिस्ती कुकींकडून स्वतंत्र राज्याची केली जाणारी मागणी ही ईशान्य भारताचे तुकडे करण्याचे षड्यंत्र आहे, हे जाणा !