Bangladesh’s Muhammad Yunus : (म्‍हणे) ‘शेख हसीना यांनी भारतात बसून बांगलादेशावर राजकीय भाष्‍य करू नये !’ – महंमद युनूस

बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांचे विधान !

डावीकडून महंमद युनूस आणि शेख हसीना

ढाका (बांगलादेश) – बांगलादेश जोपर्यंत शेख हसीना यांच्‍या प्रत्‍यार्पणासाठी भारताशी चर्चा करत नाही, तोपर्यंत त्‍यांनी तोंड बंद ठेवावे, जेणेकरून दोन्‍ही देशांमधील संबंध पूर्वीसारखेच रहातील, असे विधान बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांना उद्देशून केले आहे. यासमवेतच त्‍यांनी भारत आणि बांगलादेश यांच्‍यामधील तणाव दूर करण्‍यासाठी आणि संबंध आणखी सुधारण्‍यासाठी एकत्र काम करण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे म्‍हटले. युनूस यांचे हे वक्‍तव्‍य शेख हसीना यांनी १३ ऑगस्‍ट या दिवशी दिलेल्‍या वक्‍तव्‍याच्‍या संदर्भात आले आहे. शेख हसीना यांनी न्‍यायाची मागणी केली होती आणि ‘बांगलादेशातील अलीकडील आतंकवादी कृत्‍ये, हत्‍या यांमध्‍ये सहभागी असलेल्‍या लोकांची चौकशी झाली पाहिजे. त्‍यांना शिक्षा झाली पाहिजे’, असे म्‍हटले होते.

१. शेख हसीना यांना सल्ला देतांना युनूस पुढे म्‍हणाले की, भारतात कुणीही शेख हसीना यांच्‍या भूमिकेशी सहमत नाही. त्‍या भारतात आहेत. त्‍या जी विधाने करतात, त्‍यामुळे समस्‍या निर्माण होतात. भारतात बसून त्‍या बोलत आहेत, सूचना देत आहेत. हे कुणालाच आवडत नाही. बांगलादेश सरकार जोपर्यंत त्‍यांना परत आणू इच्‍छित नाही, तोपर्यंत त्‍यांना गप्‍प बसावे लागेल.

२. युनूस म्‍हणाले की, बांगलादेश भारताशी भक्‍कम संबंधांना महत्त्व देतो; मात्र ‘शेख हसीना यांच्‍याविना बांगलादेशाची स्‍थिती अफगाणिस्‍तानसारखी होईल’ या विचारातून भारताला बाहेर पडावे लागेल. अवामी लीग वगळता इतर राजकीय पक्षांना ‘इस्‍लामी’  म्‍हणून चित्रित करणेही बंद केले पाहिजे. ‘हसीना यांच्‍या नेतृत्‍वामुळेच देशाला स्‍थैर्य मिळते’ असे म्‍हणणे भारताने थांबवले पाहिजे.

संपादकीय भूमिका

या विधानावरून बांगलादेश शेख हसीना यांच्‍याशी कसे वागणार आहेत, हे लक्षात  येते ! ही स्‍थिती येण्‍याला शेख हसीना याच उत्तरदायी आहेत. त्‍यांनी कठोर निर्णय घेतला असता, तर आज ही स्‍थिती आली नसती !