Kerala Church : केरळमधील ६ चर्च नियंत्रणात घेण्‍याचे उच्‍च न्‍यायालयाचे जिल्‍हाधिकार्‍यांना निर्देश !

थिरूवनंतपूरम् – केरळ उच्‍च न्‍यायालयाने एर्नाकुलम आणि पलक्‍कड यांच्‍या जिल्‍हाधिकार्‍यांना मलंकारा ख्रिस्‍त्‍यांच्‍या मालकीचे ६ चर्च कह्यात घेण्‍याचे निर्देश दिले आहेत. मलंकारा ख्रिस्‍त्‍यांच्‍या जेकोबाइट आणि ऑर्थोडॉक्‍स या २ गटांमध्‍ये या चर्चच्‍या संदर्भात दीर्घकाळ विवाद होता. ऑर्थोडॉक्‍स गटातील २ पाद्रयांनी प्रविष्‍ट (दाखल) केलेल्‍या अवमान याचिकेवर उच्‍च न्‍यायालयाने हे निर्देश दिले.

१. केरळ उच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायाधीश व्‍ही.जी. अरुण यांनी न्‍यायालयाच्‍या वर्ष २०२२ च्‍या निर्देशाचे पालन न केल्‍याविषयी टीका केली. ‘या निर्देशामध्‍ये मलंकारा ऑर्थोडॉक्‍स चर्चच्‍या (ऑर्थोडॉक्‍स गटाच्‍या) सदस्‍यांना या चर्चमध्‍ये प्रवेश करण्‍याची आणि शांततेने उपासना करण्‍याची अनुमती होती; परंतु जेकोबाइट ख्रिस्‍ती ऑर्थोडॉक्‍स ख्रिस्‍त्‍यांना चर्चमध्‍ये प्रवेश करण्‍यापासून अटकाव करत होते. त्‍यामुळे आता जिल्‍हाधिकार्‍यांना या चर्च कह्यात घेण्‍याशिवाय पर्याय नाही’, असे न्‍यायाधीशांनी सांगितले.

२. राज्‍य सरकारने न्‍यायालयाला सांगितले, ‘न्‍यायालयाच्‍या निर्देशांची कार्यवाही करण्‍यासाठी सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले होते; परंतु जेकोबाइट गटाच्‍या कारवायांमुळे सरकारला माघार घ्‍यावी लागली. सरकारी हस्‍तक्षेपामुळे जीवित आणि मालमत्ता यांची हानी होऊ शकली असती.’

३. जेकोबाइट गटाच्‍या सदस्‍यांनी न्‍यायालयाला सांगितले की, चर्च ऑर्थोडॉक्‍स गटाकडे सोपवले जाऊ शकत नाहीत.

४. उच्‍च न्‍यायालयाने जेकोबाइट गटाचा आक्षेप फेटाळून लावला आणि एर्नाकुलमच्‍या जिल्‍हाधिकार्‍यांना ओडक्‍कली येथील सेंट मेरीज ऑर्थोडॉक्‍स चर्च, पुलिंथनम येथील सेंट जॉन्‍स बेसफेझ ऑर्थोडॉक्‍स सीरियन चर्च आणि माझुवन्‍नूर येथील सेंट थॉमस ऑर्थोडॉक्‍स सीरियन चर्च हे ३ चर्च नियंत्रणात घेण्‍याचे आदेश दिले.

५. तसेच उच्‍च न्‍यायालयाने पलक्‍कड जिल्‍हाधिकार्‍यांना मंगलम धरण येथील सेंट मेरी ऑर्थोडॉक्‍स चर्च, एरिकिन्‍चिरा येथील सेंट मेरी ऑर्थोडॉक्‍स सीरियन चर्च आणि चेरुकुन्‍नम येथील सेंट थॉमस ऑर्थोडॉक्‍स सीरियन चर्च यांचा कार्यभार स्‍वीकारण्‍यास सांगण्‍यात आले.

ऑर्थोडॉक्‍स आणि जेकोबाइट गटांमधील वाद काय आहे ?

ऑर्थोडॉक्‍स आणि जेकोबाइट गट हे प्रारंभी एकाच चर्चचा भाग होते; परंतु चर्चच्‍या निष्‍ठेवरून मतभेद निर्माण झाले आणि ते वेगळे झाले. ऑर्थोडॉक्‍स गट केरळच्‍या एका बिशपशी (मलंकारा मेट्रोपॉलिटन) निष्‍ठा ठेवतो, तर जेकोबाइट गट अँटिओकच्‍या धर्मगरूंना (सीरियन ऑर्थोडॉक्‍स चर्चचा प्रमुख) त्‍यांचा धार्मिक प्रमुख मानतो. या मतभेदानंतर केरळमधील विविध चर्चचे व्‍यवस्‍थापन कोणत्‍या गटाकडे सोपवायचे, यावरून दोन गटांमध्‍ये वाद चालू झाला. (हिंदु धर्मात जातीव्‍यवस्‍था आहेत, असे सांगून त्‍याला नावे ठेवणारे निधर्मीवादी ख्रिस्‍ती पंथातील अशा गटबाजीविषयी काही बोलत नाहीत ! – संपादक)