Sharia Law In Bangladesh : बांगलादेशात शरीयत कायदा लागू होणार ! – डॉ. तस्‍लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

डॉ. तस्‍लिमा नसरीन

ढाका – बांगलादेशामध्‍ये शेख हसीना यांचे सरकार कोसळल्‍यानंतर कट्टरतावाद्यांची देशावरील पकड बळकट होण्‍याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. बांगलादेशी लेखिका डॉ. तस्‍लिमा नसरीन यांनी म्‍हटले आहे की, बांगलादेशातील कट्टर इस्‍लामी संघटना बांगलादेशात शरीयत कायदा लागू करतील. त्‍याचे परिणाम तेथील महिलांना भोगावे लागतील. ‘द न्‍यू इंडियन एक्‍सप्रेस’शी बोलतांना त्‍यांनी हे मत मांडले. डॉ. तस्‍लिमा नसरीन गेल्‍या अनेक वर्षांपासून भारतात निर्वासित जीवन जगत आहेत.

तस्‍लिमा नसरीन म्‍हणाल्‍या की

१. बांगलादेशात कट्टरपंथी इस्‍लामवादी शरीयत कायद्यानुसार महिलांचे अधिकार काढून घेऊन त्‍यांच्‍यावर अनेक निर्बंध लादतील. अलीकडेच इस्‍लामी वस्‍त्रसंहितेविषयी (ड्रेस कोड) विद्यापिठांनी आदेश जारी करण्‍यास चालू केले आहे. अनेक विद्यापिठांमध्‍ये मुलींना वस्‍त्रसंहिता पाळण्‍यास सांगितले आहे. हिजाब आणि बुरखा घालणे यांचे ‘ड्रेस कोड’ म्‍हणून वर्णन केले आहे.

२. बांगलादेशात असहिष्‍णुता वाढत आहे. तेथे अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य नाही. मानवी हक्‍कांचे उल्लंघन होत आहे.

३. महंमद युनूस यांच्‍या नेतृत्‍वाखालील अंतरिम सरकार देशातील परिस्‍थिती आणखी बिकट करेल; कारण शेख हसीना यांना सत्तेवरून हटवल्‍यानंतर झालेल्‍या हिंसाचाराला ‘उत्‍सव’ संबोधले जात आहे.

४. देशातील मंदिरे उद़्‍ध्‍वस्‍त करण्‍यात आली. संग्रहालय आणि शेख मुजीबुर रहमान यांच्‍या पुतळ्‍यांची तोडफोड करण्‍यात आली. हिंदु अल्‍पसंख्‍याकांना लक्ष्य करण्‍यात आले. देशात कट्टरतावाद अनेक पटींनी वाढला आहे.

संपादकीय भूमिका

असे झाल्‍यास तेथील हिंदू नामशेष होतील, हे निश्‍चित ! हे लक्षात घेऊन तेथील हिंदूंच्‍या रक्षणासाठी भारत सरकार प्रयत्न करणार का ?