सावंतवाडी आणि दोडामार्ग येथे विश्व हिंदु परिषदेच्या वतीने हिंदू संमेलन
सिंधुदुर्ग – आपल्या मुलांना आपण काय शिक्षण देतो आणि घरात कोणते संस्कार देतो, हे महत्त्वाचे आहे. आपल्या शाळा आणि इतर शाळा यांच्या संस्कृतीत पुष्कळ फरक दिसतो. मी तो फरक स्वत: अनुभवलेला आहे. आज सर्वप्रथम आपण हिंदु म्हणून एकत्र येणे आवश्यक आहे. आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करणे आवश्यक आहे. हिंदु धर्मात नमस्कार करणे, देवाला प्रार्थना करणे एवढ्याच गोष्टी नाहीत, तर अन्य भरपूर ज्ञान आहे. ते आपण समजून घेतले पाहिजे. आपली संस्कृती जपली पाहिजे, असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी येथे आयोजित हिंदू संमेलनात केले.
विश्व हिंदु परिषदेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त परिषदेच्या वतीने ठिकठिकाणी हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत सावंतवाडी आणि दोडामार्ग येथे आयोजित संमेलनाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि हिंदु बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावंतवाडी शहरातील श्री आत्मेश्वर मंदिरात आयोजित संमेलनात युवराज भोसले बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत मणेरीकर, विश्व हिंदु परिषदेचे केशव फाटक, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पुराणिक आदींनी मार्गदर्शन केले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, इस्कॉन, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागरण समिती, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दोडामार्ग येथे आयोजित हिंदू संमेलनाला प्रमुख वक्ते म्हणून हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनी मार्गदशर्न केले. ‘मुसलमानांची लोकसंख्यावाढ, वक्फ बोर्ड, लव्ह जिहाद, हलाल जिहाद, अर्बन नक्षलवाद अशा विविध संकटांनी देशाला ग्रासलेले आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करणे ही काळाची आवश्यकता आहे’, असे प्रतिपादन श्री. चोडणकर यांनी या वेळी केले.
या वेळी विशेष अतिथी श्री. विवेकानंद नाईक, श्री. चेतन चव्हाण (नगराध्यक्ष, दोडामार्ग), श्री. सतीश राजाराम घोडगे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. मनोज वझे, प्रखंड मंत्री श्री. नीलेश साळगावकर, बजरंग दलाचे संयोजक श्री. नीळकंठ फाटक आणि दुर्गावाहिनीच्या जिल्हाप्रमुख कु. हर्षदा राजपुरोहित आदी उपस्थित होते.
विश्व हिंदु परिषदेच्या वतीने विविध संस्था आणि संप्रदाय यांचा सत्कार
देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या श्री दत्त पद्मनाभ पीठ, जीवनविद्या मिशन, श्री काडसिद्धेश्वर संप्रदाय, श्री संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदाय, श्री सिद्ध समाधी योग, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भारत माता की जय संघटना, ब्राह्मण महासंघ, शिवजयंती उत्सव समिती, वीर सावरकर युवा मंच, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था या संस्था अन् संप्रदाय यांचा विश्व हिंदु परिषदेच्या वतीने या वेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.