वाळपई बाजारात शिरले पाणी, अवघ्या काही घंट्यांमध्ये वाळवंटी नदीला पूर, सांखळी येथे रस्ते पाण्याखाली
डिचोली आणि सांखळी परिसरात २ सप्टेंबर या दिवशी सकाळपासून जोरदार पाऊस पडला. यामुळे या ठिकाणी पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या काही घंट्यांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाचा जोर एवढा प्रचंड होता की, वाळपईबरोबर डिचोली, होंडा, सांखळी येथील रस्ते पाण्याखाली गेले. काही ठिकाणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वहात असल्याने अनेक वाहनचालक रस्त्यावर मध्येच अडकून पडले होते. वेळूस, म्हादई, रगाडा आणि वाळवंटी नद्यांची पाण्याची पातळी अचानकपणे वाढली आहे. सध्या चतुर्थीसाठी खरेदी चालू असल्याने नागरिकांना या पावसाचा मोठा फटका बसला.
वाळपई बाजारात शिरले पाणी
वाळपईबरोबरच होंडा भागातील रस्ते पाण्याखाली गेले. वाळपई येथे श्री हनुमान मंदिर परिसरात असलेल्या शेडमध्ये गटारांतील पाणी शिरले, तसेच दुकानांमध्ये पाणी जाऊन त्यांचेही सामान वाहून गेले. वाळपई, होंडा बाजार, गावकरवाडा-होंडा, नारायणनगर, श्री नवनाथ मंदिर, होंडा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी भरून काही ठिकाणी घर आणि दुकाने यांमध्ये पाणी शिरले.
गावकरवाडा-होंडा येथे वसंत गावस यांच्या घरामध्ये पाणी शिरले. होंडा येथील स्टेट बँकेच्या शाखेतही पाणी शिरले. काही वेळाने पावसाचा जोर अल्प झाल्यानंतर येथील पाण्याच्या पातळीत घट झाली. अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. बराजण, सत्तरी येथे एका रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक सुमारे १ घंटा बंद होती.
काही घंट्यांमध्ये वाळवंटी नदीला आला पूर
सांखळी आणि आसपासच्या परिसरात २ सप्टेंबरला दुपारी १.३० वाजता पाऊस चालू झाला. दुपारी १.३० वाजेपर्यंत शांतपणे वाहणार्या वाळवंटी नदीला अवघ्या काही घंट्यांमध्ये पूर आला. दुपारी ३ वाजेपर्यंत वाळवंटी नदी पात्राच्या बाहेर वाहू लागली, तर काही वेळाने नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. भरती ओसरल्यानंतरही वाळवंटी नदीला पूर आला आहे. डोंगरमाथ्यावर पावसाची जोरदार वृष्टी चालू असल्याने सांखळी येथे पूरस्थिती उद्भवली आहे. सांखळी येथे सोमवारचा आठवड्याचा बाजार भरतो. जोरदार पावसाचा बाजारावरही परिणाम झाला. सांखळी येथील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यालयासमोरची स्थिती आणखी बिकट होती.
साकोर्डा येथे रगाडा नदीवरील पुलावर महिला अडकून पडल्या
साकोर्डा येथे रगाडा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंना पाण्याची पातळी वाढत असल्याने पुलावर २ महिला अडकून पडल्या. अग्नीशमनदलाचे सैनिक या महिलांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
पोलीस अधीक्षक (वाहतूक) यांनी डिचोली आणि सांखळी परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने वाहनचालकांना काळजीपूर्वक वाहन हाकण्याचे आवाहन केले आहे.
दोडामार्गमध्ये अतीवृष्टी
दोडामार्ग – तालुक्यात २ सप्टेंबर या दिवशी ढगफुटीसदृश पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आय.टी.आय.च्या) इमारतीमध्ये पुराचे पाणी शिरले होते. दोडामार्ग म्हावळणकरवाडी येथील लहान पूल (कॉजवे) पाण्याखाली गेल्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली. दोडामार्ग ते बांदा, दोडामार्ग ते तिलारी या मार्गांवर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.