पुणे येथे गोरक्षण करतांना कसायांना साहाय्य करणार्‍याविरुद्ध तक्रार !

(प्रतिकात्मक चित्र)

पुणे – येथील ओम गुरुंग याने ५ मे २०२४ पासून आतापर्यंत गोरक्षकांसमवेत गोरक्षणाच्या कार्याचा बहाणा केला. गोरक्षक हत्येसाठी नेणार्‍या गोवंशियांना वाचवण्यासाठी जात असतांना ओम गुरुंग याने त्यांच्या मोहिमेची इत्यंभूत माहिती कसायांना पुरवली. त्या गायींची कत्तल करण्यास कसायांना साहाय्य केले. त्याचा मोबदला म्हणून ओम गुरुंग याने विविध कसायांकडून त्याच्या आणि त्याच्या आईच्या, तसेच मित्रांच्या बँक खात्यांवर लाखो रुपये स्वीकारले.

‘त्याने वारंवार लोणी काळभोर पथकर नाका येथे गोरक्षक कसायांच्या गाड्या पकडतांना, तसेच धुळे येथे गोरक्षक कसायांच्या गाड्या पकडतांना अशा प्रकारचे दुष्कृत्य केले आहे. त्यामुळे त्याच्यावर न्यायालयीन कारवाई करावी’, अशी तक्रार सध्या गोरक्षणाचे कार्य करत असलेल्या आकाश भैसडे यांनी येथील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली आहे.

आकाश भैसडे यांनी सांगितले की, ओम गुरुंग याने कसायांकडून पैसे घेतले असल्याचे मान्य केले आहे. त्याच्या भ्रमणभाषमध्ये लोणी काळभोर हद्दीतून चोरलेल्या काही दुचाकींची त्याने बोदवड, भुसावळ, जिल्हा जळगाव येथे विक्री केल्याविषयीचे छायाचित्र सापडले. याविषयी आम्ही जळगाव येथील गोरक्षकांकडे दुचाकींची निश्चिती केली. तेव्हा ओमनने त्या चोरीच्या दुचाकी गाड्या जळगाव येथील देवेश माळी याला विकल्याचे समजले. त्याच्या भ्रमणभाषमध्ये काही काडतुसे आणि अग्निशस्त्रे यांची छायाचित्रेही सापडली.

संपादकीय भुमिका

  • गोरक्षणाचे नाटक करणारे गोरक्षकांच्या गटात सहभागी न होण्यासाठी गोरक्षकांनी सतर्कता वाढवणे आवश्यक !
  • गोरक्षणाच्या कार्यात कसायांशी हातमिळवणी करणार्‍या अशा फसव्या गोरक्षकांना आजन्म कारावासात डांबायला हवे !