चित्रपटसृष्टीतील लैंगिक अत्याचार हा विषय समाजासाठी नवीन नाही. मध्यंतरी महाराष्ट्रात ‘मी टू’च्या (लैंगिक शोषणाच्या विरोधात तरुणींनी चालू केलेली चळवळ) चळवळीमुळे वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टी वासनांधतेने किती बरबटलेली आहे, हे उघड झाले. गेल्या काही दिवसांमध्ये लैंगिक अत्याचारांच्या आरोपांनी मल्ल्याळम् चित्रपटसृष्टीचे (मॉलीवूडचे – ज्याला ‘हॉलिवूड’च्या अंधानुकरणातून ‘मॉलीवूड’ म्हटले जाते) वास्तव समोर आले. त्यात भरीस भर म्हणजे तमिळ कलाकारांनीही त्यांचा भयंकर लैंगिक छळ झाल्याच्या कथा सांगून तमिळी चित्रटपसृष्टीची काळी बाजू उघड केली. अभिनेत्री आणि दूरदर्शन मालिका निर्माती कुट्टी पद्मिनी यांनी एका तमिळी कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत याविषयीचे आरोप केले. लैंगिक छळ झाल्याने अनेक महिलांनी आत्महत्या केल्याचेही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘अनेकदा दिग्दर्शक लैंगिक इच्छेविषयी विचारतात. चित्रपटसृष्टी हासुद्धा इतर व्यवसायांप्रमाणेच आहे. मग या क्षेत्रात देहव्यापार का चालतो ? हे अत्यंत चुकीचे आहे. वयाच्या १० व्या वर्षी माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले. मी माझ्या आईला याविषयी सांगितले. आईने याची तक्रार केल्यावर मला चित्रपटातून काढून टाकण्यात आले. लैंगिक छळ झाल्याचे कोणतीही महिला सिद्ध करू शकत नाही. त्यामुळे अत्याचार करणार्यांचे फावते. याचा अपलाभ उठवला जातो.’’
अभिनेत्री सोनिया मल्हार हिनेही तिच्या कारकीर्दीच्या प्रारंभीच्या काळात गैरवर्तन आणि शोषण झाल्याच्या घटना उघड केल्या. तिने सांगितले, ‘‘वर्ष २०१३ मध्ये मी या क्षेत्रात आले. येथे नवीन आलेल्या कलाकारांची मुख्य कलाकारांशी ओळख करून दिली जात नाही. मी चित्रीकरणाच्या ठिकाणी पोचले, तेव्हा वैयक्तिक आवरत असतांना कुणीतरी मला मागून धरून ठेवले होते. त्यानंतर माझे चुंबन घेतले. यानंतर मला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. चित्रपटांमध्ये मी काम करत होते; पण मला पैसे मिळण्यास विलंब होत होता. वर्तमानपत्रात आणि दूरचित्रवाहिन्यांवर चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर अचानक मला चित्रपटातून काढून टाकण्यात आले. इतर राज्यांतील एका अभिनेत्रीलाही असे वाईट अनुभव आल्याचे समजले.’’ अभिनेते मुकेश एम्., जयसूर्या, मणियानपिल्ला राजू आणि इदवेला बाबू यांच्यावरही शाब्दिक अन् शारीरिक शोषण केल्याचा आरोप झाला आहे.
अहवालामुळे चित्रपटसृष्टीचे बिंग फुटले !
‘हेमा समिती’चा अहवाल केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना सादर करण्यात आला. जवळजवळ ५ वर्षांनी म्हणजे १९ ऑगस्ट २०२४ या दिवशी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यात शोषण, लैंगिक छळ, सत्तेचा गैरवापर इत्यादी काळी कृत्ये उघड झाली आहेत. मल्ल्याळम् चित्रपटसृष्टीत संधी मिळण्यासाठी ‘समझौता’ आणि ‘अॅडजस्टमेंट’ या दोन शब्दांचा कोडवर्ड म्हणून वापर केला जातो, असे अहवालात म्हटले आहे. अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून केवळ ४८ घंट्यांत काही महिला कलाकारांनी ‘आमच्याशी दिग्दर्शक/कलाकार यांनी लैंगिक गैरवर्तन केले’, असा आरोप केला. अहवालात महिलांना कपडे पालटण्यासाठी खोली, तसेच प्रसाधनगृह यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवल्या न जाणे, महिलांना लैंगिक संबंध ठेवण्यासाठी बळजोरी केली जाणे, नकार दिल्यास माफियांनी त्यांचा छळ करणे, महिला अभिनेत्रींना पुरुषांच्या तुलनेत अल्प मानधन दिले जाणे इत्यादी विषय मांडून त्यासंदर्भातील वास्तव सर्वांसमोर आणण्यात आले आहे. एका अभिनेत्रीने सांगितले, ‘‘लैंगिक अत्याचारामुळे मला मल्ल्याळम् चित्रपटसृष्टी सोडून चेन्नईला जावे लागले.’’ हे सर्वच धक्कादायक आणि तितकेच चिंताजनकही आहे. २९० पानांच्या या अहवालातील ४४ पाने गहाळ आहेत. महिलांचे शोषण करणार्या पुरुषांची माहिती या पानांमध्ये होती. ही पाने कुणी गहाळ केली ? यातून कुणाला तरी संरक्षण देऊन प्रकरण पुसून टाकण्याचा प्रयत्न होत नसेल कशावरून ? अहवालाची पाने गहाळ होतातच कशी ? पाने गहाळ करणार्यांवर कारवाई होणार का ? सरकारने या गहाळ पानांमधील लिखाण मिळून ते सत्यही देशासमोर उघड करायला हवे.
वर्ष २०१९ मध्ये हेमा समितीने केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांना अहवाल सादर केला होता; मात्र तो ५ वर्षे शीतगृहातच राहिला. सरकारने इतकी वर्षे त्याविषयी मौन का बाळगले ? अहवालातील सत्य त्याच वेळी समाजासमोर का आणले नाही ? याही प्रकरणांची चौकशी व्हायला हवी. या आणि अशा सर्वच प्रकरणांच्या चौकशीसाठी सरकारने विशेष अन्वेषण पथक (एस्.आय.टी.) स्थापन केले आहे. आता यातून दडवण्यात आलेले सत्य समोर येईल, अशी आशा बाळगूया.
हेमा समितीचा अहवाल उघड झाल्यावर २ अभिनेत्रींकडून ज्येष्ठ अभिनेते सिद्दीकी यांच्यावर बलात्कार आणि छळ केल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे सिद्दीकी यांच्यावर ‘मल्ल्याळम् मूव्ही आर्टिस्ट (ए.एम्.ए.एम्.ए.) च्या महासचिव पदाचे त्यागपत्र देण्याची नामुष्की ओढवली. अलीकडे बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्रा हिने मल्ल्याळम् दिग्दर्शक रंजित यांच्यावर अनुचित वर्तनाचा आरोप केला होता. यानंतर रंजित यांनी ‘केरळ चलचित्र अकादमी’च्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले. हे असे घडले; कारण महिलांमध्ये असे घडवण्याचे सामर्थ्य आहे. केवळ त्यांनी पुढे येऊन अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवायला हवा. बरेचदा महिला किंवा अभिनेत्री ‘स्त्री-पुरुष समानता’ या विषयावरच वाद घालत बसतात. त्याचेच समर्थन करतात. ही समानता साध्य होण्यासाठी जिवाचा आटापिटा करतात; पण अत्याचारांच्या विरोधात ‘ब्र’ही काढत नाहीत. आताही ‘हेमा समितीच्या अहवालानंतर अगदी मोजक्याच महिला किंवा अभिनेत्री पुढे आलेल्या आहेत; पण जे प्रथितयश कलाकार आहेत, त्यांचे काय ? या क्षेत्रातच जर वासनांध टपून बसलेले असतील, तर भविष्यात महिलांवर अत्याचार करणारे नराधमांचे प्रमाण आणखी वाढेल, हे लक्षात घ्यायला हवे !
आता पुढे काय ?
केरळ सरकारने सांगितले की, लैंगिक शोषण झालेल्या अभिनेत्रींनी तक्रार प्रविष्ट केल्यास सरकार त्यांची चौकशी करील, म्हणजेच काय तर सरकार स्वत:हून संबंधितांवर कारवाई करणार नाही ! काही महिलांनी याआधीही लैंगिक शोषणाच्या संदर्भातील पुरावे समितीला सादर केले होते; पण त्यानुसार कारवाई झालीच नाही. मग ते पुरावे गेले कुठे ? कि ते दाबण्यात आले ? आता सर्वकाही सरकारच्या हातात आहे. सरकारने पुढाकार घेणेच यात महत्त्वाचे ठरेल. महिलांनीही एखादा अहवाल उघड होण्याची वाट न पहाता अशा प्रकरणांची वाच्यता करायला हवी. मोठ्या प्रमाणात तक्रारी करायला हव्यात, संघटित होऊन आवाज उठवायला हवा. तसे झाल्यासच सर्वच क्षेत्रांमधील महिला लैंगिक अत्याचाराची शिकार होण्यापासून वाचतील आणि सुरक्षित रहातील. चित्रपट क्षेत्राद्वारे समाजात फोफावणारी अनाचाराची कीड वेळीच नष्ट केल्यास अन्य क्षेत्रांतूनही ती संपेल. असे होण्यातच देशाचा उत्कर्ष सामावला आहे, हे लक्षात घ्या !
महिलांनी केवळ ‘स्त्री-पुरुष समानते’चा डांगोरा पिटण्यापेक्षा महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणे आवश्यक ! |