१. व्यष्टी आणि समष्टी सेवा करतांना आनंद मिळू लागणे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर पाठीशी आहेत’, याविषयी अनुभूती येणे
‘कोरोना’ महामारीच्या काळापासून, म्हणजे चार वर्षांपासून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी मला ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ या साधनामार्गात आणले. सनातन संस्थेच्या साधनासत्संगांच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ प्रवचने, सत्संग ऐकणे, नामजप सत्संगाला जोडणे’, आदी माध्यमांतून माझ्या साधनेचा प्रारंभ झाला. सत्संगात सांगितल्याप्रमाणे व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतांना भगवंताविषयी भाव दृढ होऊन माझे मन शांत झाले. हळूहळू समष्टी सेवेतूनही मला आनंद मिळू लागला आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्या पाठीशी आहेत’, याविषयी अनुभूती येऊ लागल्या.
२. ‘कोरोना’ महामारीच्या काळात मुलीला अभ्यासासाठी भ्रमणभाष हवा असणे; पण सत्संगाच्या वेळी तिने तो आठवणीने देणे आणि स्वतःही बालसंस्कार वर्ग अन् भक्तीसत्संग ऐकणे
आरंभी ‘ऑनलाईन सत्संग’ ऐकतांना मला पुष्कळ अडथळे यायचे. ‘कोरोना’ महामारीच्या काळात मुलांच्या शाळा ‘ऑनलाईन’ असायच्या. त्या वेळी शाळेच्या ‘व्हॉट्सॲप’ गटावर गृहपाठ पाठवले जायचे. त्यामुळे माझ्या धाकट्या मुलीलाही भ्रमणभाष हवा असायचा. काही दिवसांनंतर सत्संगाची वेळ झाल्यावर ‘आई तुला सत्संग ऐकायचा आहे ना ?’, असे म्हणून ती आठवणीने मला भ्रमणभाष आणून देऊ लागली. नंतर तिलाही ‘ऑनलाईन बालसंस्कार वर्ग’ ऐकायला आवडू लागले. ‘गोष्ट ऐकायला मिळते’; म्हणून गुरुवारचा भक्तीसत्संगही ती आनंदाने ऐकत असे. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती माझा कृतज्ञताभाव जागृत होई.
३. गुडघेदुखीमुळे घरात चालतांनाही त्रास होणे; पण साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या अंकवितरणासाठी बाहेर गेल्यावर गुडघा दुखायचा थांबणे
वर्ष २०२३ मध्ये मला साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे अंकवितरण करण्याची सेवा मिळाली. एकदा मला गुरुवारी गावाला जायचे होते; म्हणून ‘जाण्यापूर्वी साप्ताहिक वितरणाची सेवा पूर्ण करावी’, असे मी ठरवले. तेव्हा माझा गुडघा दुखत होता आणि घरात चालतांनाही मला त्रास होत होता. त्या वेळी साप्ताहिकचे अंक सोमवारी उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे ‘सेवा कशी पूर्ण होणार ?’, असे मला वाटू लागले. त्या वेळी मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना प्रार्थना केली आणि दुसर्याच दिवशी मला अंक मिळाले. मी ते देण्यासाठी बाहेर पडले आणि आश्चर्य म्हणजे माझा गुडघा दुखायचा थांबला. समष्टी सेवेला बाहेर पडल्यावर ‘भगवंताने कोणताही अडथळा येऊ दिला नाही’, याची अनुभूती या प्रसंगांतून घेता आली.’
– सौ. अर्चना चैतन्य पावगी, कोथरूड, पुणे. (२८.७.२०२४)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |