१. दैनिक ‘सनातन प्रभात’ च्या वाचकांच्या आईंना ‘सनातन प्रभात’प्रती असलेला आदर
‘श्री. अरुण वाकडीकर मागील ३ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. आम्ही दैनिक ‘सनातन प्रभात’ त्यांच्याकडे देण्यासाठी त्यांच्याकडे गेल्यावर त्यांच्या आईंना आनंद होतो. त्या दैनिक ‘सनातन प्रभात’ हातात घेऊन नमस्कार करतात. त्या दैनिक ‘सनातन प्रभात’ पूर्ण वाचतात. त्या त्यातील महत्त्वाची सूत्रे त्यांच्या सुनेला सांगतात.
१ अ. श्रीराम, कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करणे : त्या श्रीरामाचा जप करतात. आम्ही त्यांना ‘कुलदेवी आणि दत्त’ यांचा नामजप सांगितल्यापासून त्या हे दोन नामजपही करतात. आम्ही त्यांच्याकडे गेल्यावर त्या त्यांनी ‘किती नामजप केला ?’, याविषयी सांगतात.
१ आ. प्रेमभाव : आम्हाला त्यांच्याकडे जायला उशीर झाला, तर त्या लगेच आमची विचारपूस करतात.’
– सौ. अनिता सराफ (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संभाजीनगर
२. ‘सनातनचे कार्य सर्वत्र पोचावे’, अशी तळमळ असलेले अधिवक्ता विकास भाले !
‘मागील २५ वर्षांपासून अधिवक्ता विकास भाले दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. त्यांना सनातनच्या कार्याविषयी पुष्कळ आदर आहे. एकदा ते मला म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे साधक चिकाटीने आणि सातत्याने कार्य करत आहेत. संस्थेचे कार्य सर्वत्र पोचले पाहिजे. गावातील लोकांना सनातन संस्थेच्या कार्याविषयी अवगत व्हायला हवे. मी चारचाकी गाडीची व्यवस्था करतो. तुम्ही माझ्या समवेत चला आणि गावातील लोकांना हे कार्य सांगा.’’
– सौ. आशा वट्टमवार, संभाजीनगर
३. नामजप आणि धर्माचरण करण्याची आवड असलेले श्री. अरुण यशवंत ठाकरे आणि सौ. अश्विनी अरुण ठाकरे
‘एकदा श्री. अरुण यशवंत ठाकरे (वय ६२ वर्षे) आणि सौ. अश्विनी अरुण ठाकरे (वय ५३ वर्षे) यांच्या घरी प्रवचन झाले. तेव्हा आम्ही त्यांना ‘कुलदेवता’ आणि श्री गुरुदेव दत्त’ यांचा नामजप अन् अन्य आध्यात्मिक स्तरावरील उपाय यांविषयी सांगितले. त्यानंतर त्यांनी प्रतिदिन नामजप करायला आरंभ केला. त्यांना शास्त्र समजल्यावर त्यांनी घरात लावलेली दिवंगत आई-वडिलांची छायाचित्रे काढून ठेवली. आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांच्या घरी शास्त्रानुसार गुढी उभारली. तेव्हा त्यांनी भावपूर्ण सिद्धता केली होती.
३ अ. सेवेची आवड : त्यांच्या घरी प्रवचन असले, तर ते दोघेही आनंदाने सर्व सेवा करतात. ते रामनवमीनिमित्त असलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या वेळी आम्हाला साहाय्य करत होते.
३ आ. संतांप्रती भाव : एकदा सद्गुरु नंदकुमार जाधव यांचे मार्गदर्शन होते. ठाकरे पती-पत्नींची सद्गुरु जाधवकाकांच्या सत्संगाला येण्याची पुष्कळ तळमळ होती. त्याच दिवशी त्यांना २ ठिकाणी लग्नाला जायचे होते, तरीही ते सत्संगाला आले आणि त्यांनी सद्गुरु जाधवकाकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.’
– सौ. शैलजा चौधरी, संभाजीनगर
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १५.७.२०२४)