‘डिसेंबर २०१६ मध्ये मी सांगली येथे वास्तव्यास होतो. तेव्हा तेथील एका प्रसिद्ध दत्तमंदिरात खेडेगावातील एक गायक भजने म्हणायला येत असत. ते गायक भावपूर्ण भजने म्हणत असत. त्यांची भजने ऐकायला आम्ही आतुरतेने जात होतो. त्यांची भजने ऐकून मला पडलेला प्रश्न आणि त्याचे देवाने दिलेले उत्तर पुढे दिले आहे.
काही शब्दांचे अर्थ :
(सूर : विविध पट्ट्यांतील स्वरांचा नाद, म्हणजे सूर.
ताल : नियमबद्ध मात्रांचा समूह, म्हणजे ताल.
लय : लय म्हणजे गती. दोन मात्रांमधील सारखे धावते अंतर, म्हणजे लय.)
सांगलीत एक प्रसिद्ध दत्तमंदिर आहे. प्रत्येक वर्षी दत्तजयंतीला मंदिराच्या सभागृहात दत्तमूर्तीसमोर खेडेगावातील एक गायक त्यांच्या तबला आणि पेटी वाजवणार्या साथीदारांसह रात्री १० वाजता भजने म्हणायला आरंभ करायचे. ते सगळे जण दुसर्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत भजने म्हणायचे.
‘ते गायक मंदिरात कधी येतात ? आणि मंदिरात आल्यावर ते भजन कधी चालू करतात ?’, याची आम्ही आतुरतेने वाट पहायचो. ‘श्री दत्ताचे नाम मुखी या माझ्या रात्रंदिनी…’, हे भजन ते भावपूर्ण म्हणायचे आणि त्यात रंगून जायचे. त्यांचे हे भजन ऐकण्यासाठी माझ्यासह बरेच जण आतुर झालेले असायचे. आरंभी ते अन्य भजने म्हणायला लागले, तर आम्ही त्यांना ‘श्री दत्ताचे नाम मुखी या माझ्या रात्रंदिनी …’, हे भजन म्हणण्याची विनंती करायचो.
हे गायक भजन म्हणत असतांना त्यांचा सूर-ताल इकडे-तिकडे व्हायचा, म्हणजेच ‘कधी गातांना सूर बेसूर लागणे, गातांना ताल चुकणे’ इत्यादी व्हायचे, तरीही त्यांचे ‘भजन ऐकत रहावे’, असे वाटायचे. ‘असे का वाटते ?’, असा प्रश्न मला पडायचा.
मी भगवंताला हा प्रश्न विचारला. तेव्हा मला पुढील उत्तर मिळाले, ‘तालाच्या निर्मितीमुळे शरीर डोलू लागते. स्वरांच्या साहाय्याने मन डोलू लागते. भावाची स्पंदने ही त्यांहून सूक्ष्म असल्याने ती थेट शरिरातील ऊर्जाचक्रांना (कुंडलिनीचक्रांना) डोलायला लावतात, म्हणजेच उत्तेजित करतात. त्यांच्या उत्तेजित होण्याने जो आनंद मिळतो, तो अवर्णनीय असतो. त्यामुळे तो सतत हवाहवासा वाटतो.’
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मला हे उत्तर समजले’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. मनोज सहस्रबुद्धे, सतारवादक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१९.८.२०२४)
जिथे भाव आहे, तिथे शब्द संपतात ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘जेव्हा मुखाने म्हणण्याचे संगीत बंद होते, तेव्हा आतील (अंतरातील) खरे संगीत चालू होते’, असे संतांनी म्हटले आहे. सूर, ताल आणि लय या स्थुलातील गोष्टींसह ‘भाव’, हा घटक महत्त्वाचा आहे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांना भावाची जोड कशी द्यावी ?’, हे शिकवले जाते. त्यामुळे कलाकार आपल्या कलेतून ईश्वराशी लवकर एकरूप होऊ शकतो. ‘जिथे भाव आहे, तिथे शब्द संपतात’, हीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची शिकवण आहे. वरील लेखातील गायकामध्ये तो भाव असल्याने त्यांचे गाणे साधकाच्या अंतर्मनाला स्पर्श करून गेले.’ – – संकलक
|