‘इंडियन टायगर्स’चे अध्यक्ष राहुल शानभाग यांनी केली तक्रार
मडगाव, २३ ऑगस्ट (वार्ता.) – पाकिस्तानच्या खेळाडूला पाठिंबा देणारी पोस्ट सामाजिक माध्यमांत प्रसारित करून येथील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी ‘इंडियन टायगर्स’ संघटनेचे अध्यक्ष राहुल शानभाग यांनी मडगाव, फातोर्डा आणि मायणा-कुडतरी या एकूण ३ पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी नोंदवल्या आहेत. तक्रारींमध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधित व्यक्तीचे नाव बिलाल असे आहे आणि तो मडगाव येथे गुजराती समाज परिसराजवळ रहातो. पोस्ट प्रसारित करणार्या संबंधित व्यक्तीने ऑलिंपिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रा याला हरवून सुवर्णपदक प्राप्त करणारा अर्शद नदीम याची प्रशंसा केली आहे, तसेच भारताच्या ६ खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये पदके मिळवल्याचा पोस्टमध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही.