दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : रायगडमध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढले !; जनक्षोभ उसळेपर्यंत महिलांवरील गुन्ह्यांची नोंद घेणार नाही का ?…

रायगडमध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढले !

रायगड – जिल्ह्यात डेंग्यूचे प्रमाण वाढत आहे. जानेवारी ते ऑगस्ट या काळात येथे डेंग्यूचे ४४६ रुग्ण आढळून आले आहेत. पनवेलसह आता उरण तालुक्यातील कोप्रोली, खोपटे, अलिबाग तालुक्यातील वाघ्रण, कावाडे, सारळ, तर पेण तालुक्यातील जिते गावात डेंग्यूचा संसर्ग वाढला आहे. प्रतिवर्षी जूनमध्ये केली जाणारी फवारणी यंदा केलेली नाही. (प्रशासनाला याविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक)


जनक्षोभ उसळेपर्यंत महिलांवरील गुन्ह्यांची नोंद घेणार नाही का ?

मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना खडसावले

मुंबई – बदलापूरमधील घटनेत जनक्षोभ उसळला. तो उसळेपर्यंत महिलांवरील गुन्हे तुम्ही गांभीर्याने घेणार नाही का ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना केला. अल्पवयिनांवरील अत्याचाराच्या घटना प्रतिदिन घडत आहेत; पण ‘जनक्षोभ उसळेपर्यंत आम्ही त्याची गांभीर्याने नोंद घेणार नाही’, असा संकेत देण्याचा प्रयत्न यंत्रणा करत आहेत का ? अशीही विचारणा न्यायमूर्तींच्या खंडपिठाने केली.


नावडेफाटा उड्डाणपुलावर मोठे भगदाड !

तळोजा – मुंब्रा-पनवेल महामार्गाला जोडणार्‍या नावडेफाटा येथील उड्डाणपुलावर मोठे भगदाड पडले आहे. भगदाडात वाहन अडकू नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी तेथे बॅरीकेड्स लावले.

संपादकीय भूमिका : इतके मोठे भगदाड पडतेच कसे ? उड्डाणपुलाची वेळोवेळी पहाणी केली जात नाही का ?


मुंबईत अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार !

मुंबई – येथे कांदिवलीत अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तिचे आई-वडील बाहेर गेले असतांना त्याने हा प्रकार केला. मुलगी काही दिवस बोलत नसल्याने आईला शंका आली. तिने विचारल्यावर मुलीने घडलेला प्रकार सांगितला.


अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी अटकेत !

अंबरनाथ – येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा संतोष कांबळे (वय ३५ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.


दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍या शेजार्‍यास अटक !

मुंबई – येथील खार दांडा परिसरात अल्पवयीन दोन सख्ख्या बहिणींचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी मुलींच्या आई-वडिलांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. आरोपीचे नाव अमन सिंह असून तो तक्रारदारांचा शेजारी आहे.