दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ‘श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना !; मुलीच्या पोटातून केसांचा गुंता काढला !…

‘श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना !

वसई – संपूर्ण देशाला हादरवून टाकणार्‍या श्रद्धा वालकर हत्या प्रकरण वर्ष २०२२ मध्ये घडले. प्रियकर आफताब पुनावाला यानेच तिची हत्या केली होती. अशा घटना रोखण्यासाठी आणि तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी श्रद्धाच्या वडिलांनी ‘श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात असूनही प्रकरणाचा निकाल लागला नसल्याची खंत श्रद्धाच्या अधिवक्त्या सीमा कुशवाहा यांनी व्यक्त केली.


मुलीच्या पोटातून केसांचा गुंता काढला !

मुंबई – येथे १० वर्षांच्या मुलीच्या पोटातून ५० से.मी. लांबीचा केसांचा गुंता शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला. परळच्या वाडिया रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनी ही शस्त्रक्रिया केली.


७ मूर्तीकारांकडून ७० सहस्र रुपयांचा दंड वसूल !

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवल्या !

नाशिक – येथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणार्‍या ७ मूर्तीकारांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७० सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नाशिकमधील अल्प पर्जन्यमान, प्रदूषण, वाढते तापमान रोखण्यासाठी, तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेने कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.

संपादकीय भूमिका : अशी कारवाई सर्वत्रच व्हायला हवी !


अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍यावर गुन्हा नोंद

नाशिक – येथील सिन्नर तालुक्यातील एका गावात घरासमोर खेळणार्‍या साडेचार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी गावातील एकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका : अशांवर कठोर कारवाईच हवी !


पुणे येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

पुणे – सामाजिक माध्यमातून एका अल्पवयीन मुलीशी ओळख निर्माण केली. तिला प्रेमाचे आमीष दाखवले. तिला धमकावून वेळोवेळी फिरायला नेले. प्रत्येक वेळी मुलीवर बलात्कार केला, त्यातून ती गर्भवती झाली. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. (अशा वासनांधांना जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक) तेव्हा सहकारनगर पोलिसांनी आरोपी सूरज गायकवाड याला अटक करून त्याच्यावर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


पुणे येथे धर्मांधाकडून युवतीचा विनयभंग !

पुणे – मुकुंदनगर येथील ‘लॅप ऑफ लक्झरी’ या पार्लरमध्ये (सौंदर्यवर्धनालय) ‘हेअर स्पा’वर सवलत देतो, असे आमीष दाखवून ‘स्पा’मध्ये बोलावून युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी अली शेख याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी १९ वर्षीय युवतीने तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

संपादकीय भूमिका : अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !