२ अल्पवयीन मुलांचे रक्ताचे नमुने पालटल्याच्या प्रकरणी २ जणांना अटक

  • कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरण

  • २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

पुणे – कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ कार अपघातातील मुख्य आरोपींसह गाडीतील अन्य अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने पालटल्याच्या प्रकरणी गुन्हे शाखेने २ जणांना अटक केली आहे. अल्पवयीन गाडीचालकाच्या दोन्ही मित्रांनी मद्यप्राशन केले असतांनाही त्यांना वाचवण्यासाठी अन्वेषण यंत्रणांची दिशाभूल केली. या कामी अटकेतील आरोपी विशाल अग्रवाल यांच्यासह ‘ससून’मधील आधुनिक वैद्यांशी संगनमत करून रक्ताचे नुमने पालटल्याचे अन्वेषणातून पुढे आले आहे.

आदित्य सूद आणि आशिष मित्तल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रक्ताचे नमुने पालटल्याच्या प्रकरणात आणखी एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. रक्ताचे नमुने कुणाच्या मध्यस्थीने पालटले ? कुणाला लाच दिली का ? याचे अन्वेषण करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २० ऑगस्ट या दिवशी न्यायालयासमोर दिली.

सूद, मित्तल आणि अनामिक अशा ३ जणांवर पुरावा नष्ट करणे आणि कट रचल्याच्या कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. त्यातील २ जणांना विशेष न्यायाधीश यू. एम्. मुधोळकर यांच्या न्यायालयात २० ऑगस्ट या दिवशी उपस्थित केले, तेव्हा त्यांना २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अपघाताच्या घटनेच्या वेळी ‘पोर्शे’ कारमध्ये असलेली दोन्ही मुले सरकार पक्षाची साक्षीदार असून, त्यांचा जबाब आरोपपत्रात नमूद आहे; परंतु त्यांच्या वडिलांना रक्ताचे नमुने पालटल्याच्या प्रकरणी आरोपी केले आहे.