गोव्यात बनावट आधारकार्डधारक विदेशी नागरिकांचा वावर

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS]

राज्याच्या सुरक्षेला धोका

पणजी, १४ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यात बनावट आधारकार्डधारक विदेशी नागरिकांचा वावर चालू आहे. पोलीस आणि प्रशासन यांनी हल्लीच भाडेकरू तपासणी मोहीम हाती घेतली असता ही गोष्ट उघडकीस आली आहे. हे विदेशी नागरिक दिसायला बंगाल किंवा तमिळनाडू येथील रहिवासी असावेत, असे वाटते; मात्र प्रत्यक्षात ते विदेशी नागरिक आहेत आणि त्यांच्याकडे भारतीय निवासी पत्ता असलेली बनावट आधारकार्ड आहेत.

बनावट आधारकार्डधारक विदेशी नागरिकांना शोधून काढण्यास पोलीस खाते असमर्थ !

पोलीस खात्यातील एक वरिष्ठ अधिकारी एका राष्ट्रीय वृत्तपत्राला याविषयी अधिक माहिती देतांना म्हणाले, ‘‘भाडेकरू तपासणी मोहीम हाती घेतली असता बनावट आधारकार्डधारक अनेक विदेशी नागरिक सापडले. पोलिसांना एखाद्या व्यक्तीचे आधारकार्ड बनावट असल्याचे लक्षात आल्यास त्याची पडताळणी करणे पोलिसांना शक्य होत नाही. आधारकार्डची तपासणी करण्यासाठी आधारकार्ड सिद्ध करणारी ‘युनिक आयडेंटीफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ हे प्राधिकरण अन्वेषणासाठी आवश्यक माहिती देण्यास नकार देते. अनेक भाडेकरू किंवा घरमालक तपासणी मोहिमेला प्रतिसाद देत नाहीत. बनावट आधारकार्डधारक विदेशी नागरिक पोलिसांना सापडल्यास ते ‘आम्ही काही दिवसांपूर्वीच गोव्यात आलो’, असे सांगतात आणि पोलिसांना ते मान्य करावे लागते. भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आधारकार्ड हा पुरावा नसला, तरी संबंधिताकडे आधारकार्ड असणे आणि त्याच्यावर भारतीय निवासी पत्ता असणे, यांमुळे तो नागरिक भारतीय असल्याचे आम्हाला मान्य करावे लागते. तात्काळ कागदपत्रे बनावट आहेत कि बरोबर आहेत ? हे तपासण्यासाठी यंत्रणा अस्तित्वात नाही.’’ (अशा स्थितीत घुसखोरी रोखणे शक्य आहे का ? केवळ नागरिकत्व सुधारणा कायदा करून चालणार नाही, तर पोलिसांनाही तपासणीसाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी लागेल ! – संपादक)

गोव्यात अनधिकृत भंगारअड्डे चालवण्याच्या व्यवसायात बांगलादेशी नागरिकांचा सहभाग

दोन वर्षांपूर्वी आंतकवादविरोधी पथक आणि उत्तर गोवा पोलीस यांनी बनावट कागदपत्रांसह गोव्यात वास्तव्य करत असलेल्या २० बांगलादेशी नागरिकांना कह्यात घेतले होते. सरकारने त्यांना बांगलादेशात परत पाठवणार असल्याचे म्हटले होते; मात्र पुढे यासंबंधी काय झाले ? याविषयीची माहिती मिळाली नाही. कह्यात घेतलेले अनेक बांगलादेशी नागरिक अनधिकृत भंगारअड्डे चालवण्याच्या व्यवसायात कार्यरत होते. हे नागरिक बनावट ओळखपत्रांच्या आधारे गोव्यात ४ – ५ वर्षे वास्तव्यास होते. नुकतेच म्हापसा येथील विस्थापित केंद्रातून ३ बांगलादेशी नागरिक पसार झाले आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत; मात्र अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. १५ ऑगस्ट या दिवशी सर्वत्र ७८ वा स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करण्यात येणार असल्याने पसार झालेल्या बांगलादेशी नागरिकांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

वाळपई परिसरात बांगलादेशी नागरिकांचा वावर

वाळपई – वाळपई परिसरात २५ हून अधिक बांगलादेशी नागरिकांचा वावर असल्याची शक्यता जाणकार व्यक्ती व्यक्त करत आहेत. या नागरिकांमुळे भावी काळात कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर तेथे हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याने देशातील बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात अनेकांकडून चीड व्यक्त केली जात आहे. वाळपई परिसरातील बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढून हाकलून लावण्याची मागणी सूज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS]