संपादकीय : स्वातंत्र्यदिनाचा संकल्प

फोटो स्त्रोत : https://knowindia.india.gov.in/

आज भारताच्या स्वातंत्र्याला ७७ वर्षे पूर्ण झाली. आजचा दिवस गेल्या ७७ वर्षांचा मागोवा घेण्याचा, क्रांतीकारकांनी मिळवलेल्या स्वातंत्र्यासाठी त्यांना अभिवादन करण्याचा ऐतिहासिक दिवस आहे ! दीडशे वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; पण ब्रिटीश भारतात येण्यापूर्वी आपण कोण होतो ? आज कोण आहोत ? आणि भारताला भविष्यात काय बनवू इच्छितो ? यांचे मनन-चिंतन करून तेजस्वी भविष्य घडवण्याची आपल्याकडे संधी आहे, हे सांगणारा आणि त्याप्रमाणे संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे.

भारत या शब्दाचा अर्थ आहे, ‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे ‘रममाण होणारा’ ! तेजामध्ये रममाण होणारा, तो भारत आणि तेजाची उपासना करणारे, ते भारतीय ! भारत या शब्दाची व्याख्या जरी लक्षात घेतली, तरी भविष्यात भारतियांना काय साध्य करायचे आहे ?, हे कळू शकेल. तेज म्हणजे संपन्नता ! भारत पुन्हा प्रत्येक क्षेत्रात संपन्नता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. खोट्या इतिहासापासून फारकत घेऊन खरा इतिहास शिकवणे, संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून शस्त्रे निर्यातीत झालेली वाढ, भारताचा वाढलेला ‘जीडीपी’ (सकल देशांतर्गत उत्पादन) अंतराळ मोहिमांसाठीचे प्रयत्न, गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजना, जुन्या कायद्यांचे देशहितकारी कायद्यांत होत असलेले परिवर्तन, युवकांच्या सबलीकरणासाठीचे प्रयत्न आदी अनेक आघाड्यांवर केंद्रातील मोदी सरकार प्रयत्नरत आहे. हे कौतुकास्पद असून त्याचे चांगले परिणामही दिसून येत आहेत. देशात हिंदुत्वाच्या दृष्टीनेही चांगले वातावरण असल्याचे म्हटले जात आहे.

याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक !

आज वारा जरी हिंदुत्वाचा वहातांना दिसत असला, तरी शिक्षणव्यवस्था, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे, लेखन, प्रशासकीय व्यवस्था यांमध्ये काही ‘अदृश्य शक्तीं’ची पाळेमुळे अत्यंत खोलवर रूतलेली आहेत, हे विसरता कामा नये. त्यामुळे भारतियांनी आजच सावध होणे महत्त्वाचे ! जरी देशात हिंदू आवाज उठवतांना दिसत असले, त्यांच्या प्रयत्नांमुळे पालटांचा आरंभ दिसत असला, तरी जे दिसत आहे, ते दाखवले जात नसेल कशावरून ? कारण भारतियांना भ्रमात ठेवण्याचे षड्यंत्र ब्रिटीश आणि त्यामागोमाग आलेले साम्यवादी यांनी सुलभपणे साध्य केले आहे. हिंदुत्वनिष्ठ सरकार शिक्षण, सामाजिक या क्षेत्रांमध्ये प्रयत्नशील आहेच; परंतु सत्ता हिंदुत्वाची असल्याने या ‘अदृश्य शक्ती’ हे खपवून घेत आहेत, असे म्हणण्याला वाव आहे. साम्यवादी आणि त्यांचे कथित विचारवंत काही काळ शांतपणे तुमच्याही नकळत तुमच्या मनात भारताविरुद्ध प्रतिमा निर्माण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या अंतर्गत हालचाली दर्शवणार्‍या भारतियांनी घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

भारतात घडणार्‍या छोट्या-मोठ्या आणि भारताबाहेर घडणार्‍या घटनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या एका घटनेत एका ‘कॅब’चालकाने त्याच्या वाहनात बसलेल्या आणि भारताविषयी अपशब्द वापरणार्‍या पाकिस्तानी व्यक्तीला वाहनातून उतरवले. कॅबचालकाची ही कृती भारतियांमध्ये असलेली देशप्रेमाची भावना दाखवणारी आहे. भारतीय आपल्या कृतींमधून आपले देशप्रेम व्यक्त करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे; परंतु काही घटना अशाही घडल्या आहेत, ज्याचा विचार करावा लागणार आहे.

लोकसभेमध्ये खासदारकीच्या शपथविधीच्या वेळी एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय पॅलेस्टाईन’ची घोषणा दिली. भारतात राहून दुसर्‍या देशाचा जयजयकार करणारे औवेसी यांना मोठा विरोध झाला, तरी त्यांनी त्याविषयी क्षमा मागितली नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या काळातच काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी ‘देशात आग लागणार आहे’, असे विधान केले होते. मणीपूरमध्येही मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. जॉर्ज सोरोसने ‘मोदींचे सरकार पाडण्यासाठी १ बिलियन डॉलर्सचा (८ सहस्र ३८३ कोटी रुपयांहून अधिक) निधी राखून ठेवत असल्याचे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये जाहीरपणे सांगितले होते. ‘इंडी’ आघाडीने ‘भाजप भारताची राज्यघटना पालटणार आहे’, अशी आवई उठवून देशभर सरकारविरोधी वातावरण निर्माण केले. भारताची आर्थिक, संरक्षणविषयक धोरणे यांवर विरोधी पक्षांनी नेहमीच मोठ्या प्रमाणात टीका करून देशात अस्थिरता टिकवून ठेवली आहे. भारताला साहाय्य करणार्‍या बांगलादेशातील शेख हसीना यांचे सरकार पडून तेथे अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. यामुळे भारताच्या बांगलादेश सीमेवरील वातावरणही तापले आहे. नुकताच हिंडेनबर्गनेही ‘सेबी’वर आरोपांचा बागुलबुवा उभा करून भारतीय आस्थापने आणि पर्यायाने भारताची जगात अपकीर्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा घटनांचा परिणाम लगेच दिसत नसला, तरी त्यांचे दीर्घकालीन परिणाम होत असतात. ब्रिटीश भारत सोडून गेले; परंतु ब्रिटिशांचा प्रभाव भारतियांवर आजही आहे, हे लक्षात घेता आता घडत असलेल्या घटनांचा विचार करून योग्य पावले उचलणे अपरिहार्य झाले आहे.

अंतर्बाह्य लढ्यात टिकून रहाण्यासाठी…

एकीकडे व्यसनाधीनतेकडे वळत असलेली, नैतिकता गमावलेली आणि नैराश्याच्या गर्तेत बुडत चाललेली युवा पिढी हे एक मोठे आव्हान देशापुढे आहे. बहुसंख्य हिंदूंचा देश असलेल्या भारतात रामनवमी, हनुमान जयंतीच्या काळात हिंदूंच्या मिरवणुकींवर आक्रमणे होत आहेत, दुसरीकडे धर्मांधांकडून ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) धमक्या देत हत्याही केल्या जात आहेत. हे सर्व चालू असतांना भारताच्या सीमाभागांतही संघर्ष चालू आहे. या अंतर्बाह्य लढ्यात टिकून रहाण्यासाठी भारताला पुन्हा एकदा त्याच्या मुळाकडे, म्हणजे महान अशा हिंदु धर्माकडे पूर्णतः वळावेच लागणार आहे.

ज्या गतीने सरकार पुढे जात आहे, त्याच गतीने सरकारने राज्यघटनेत घुसडलेल्या ‘निधर्मी’ हा शब्द काढून तिथे ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द घातला, तर सुराज्य येण्यासाठी मोठी गती येईल; कारण ‘हिंदु राष्ट्र’ या केवळ एका शब्दामुळेच देशांतर्गत आणि देशाबाहेरील अनेक शत्रूंना जरब बसेल अन् काही समस्या तिथल्या तिथेच सुटण्यास साहाय्य होईल. त्यासमवेतच भारताचा नागरिक म्हणून केवळ स्वातंत्र्यदिन साजरा करतांना देशाशी संबंधित घटनांकडे सदसद्विवेकबुद्धी ठेवून पहायला हवे. त्याविषयी चिंतन करून सातत्याने देशप्रेम व्यक्त करणार्‍या कृती करायला हव्यात. नेहरू, काँग्रेस आणि छुपे साम्यवादी यांनी देशाची जी स्थिती केली, त्यातून भारताला बाहेर काढण्यासाठी देशाप्रतीचे प्रत्येक कर्तव्य पार पाडायलाच हवे. शिक्षण, न्यायव्यवस्था, प्रशासन, राजनीती, अर्थ, संरक्षण यांसह प्रसारमाध्यमे, साहित्य आदी सर्वच क्षेत्रांत भारत पुन्हा संपन्न होण्यासाठी भारतियांनी कंबर कसणे, हाच स्वातंत्र्यदिनासाठी संकल्प ठरेल !