भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट ही पॅरिस ऑलिंपिकमध्ये ५० किलो वजन असलेल्या कुस्तीच्या गटात अंतिम फेरीत पोचली; मात्र अंतिम फेरीपूर्वीच्या चाचणीत तिचे वजन १०० ग्रॅमने वाढल्याचे लक्षात आल्याने नियमानुसार विनेश अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली आणि सुवर्ण पदक मिळवण्याचे तिचे स्वप्न भंगले. विनेश ही एकामागून एक ३ लढती खेळली. पहिल्या लढतीमध्ये ती जिंकली आणि ती उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरली. त्यानंतर ती दुसर्या लढतीत जिंकली आणि उपांत्य फेरीत पोचली. तिसरी लढत झाली आणि त्यानंतर ती थेट अंतिम फेरीत पोचली. त्यामुळे विनेश आता सुवर्ण किंवा रौप्य पदक पटकावणार, हे निश्चित झाले होते; पण त्यानंतर जे काही घडले, त्यामुळे तिला थेट ऑलिंपिकमधून बाहेर पडावे लागले. यामुळे भारतालाही मोठा धक्का बसला आहे. विनेश फोगाटला अतिरिक्त वजनामुळे स्पर्धेतून अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला विनेशने आव्हान दिले आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये तिने युस्नेलिस गुझमन लोपेझसह संयुक्त रौप्य पदक देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे याचिका प्रविष्ट केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद आता कुस्तीपटू विनेश फोगाट प्रकरणी १३ ऑगस्ट या दिवशी निकाल देणार आहे. याच काळात या प्रकरणी ‘एन्.डी.टी.व्ही.’ वृत्तवाहिनीशी बोलतांना युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचे प्रमुख नेनाद लालोविच म्हणाले की, विनेश फोगाट हिने याचिका प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला, तरी निकालातही फारसा पालट नसेल; कारण कुस्ती मंडळ केवळ घालून दिलेल्या नियमांचे पालन करते.
भावनाशीलतेपेक्षा नियम महत्त्वाचा !
विनेश फोगाट या जिगरबाज, लढाऊ आणि कमालीच्या प्रतिकूलतेतही स्पर्धात्मकता कायम ठेवू शकणार्या जिद्दी खेळाडू आहेत. त्यांच्याविषयी अतीव करुणा, सहानुभूती व्यक्त केली, तरी नियम हा नियमच असतो. तिथे भावनाशीलतेला थारा नसतो. विनेश हिला बाहेर काढल्यामुळे भारतियांना दुःख झाले, तरी यामध्ये नेमकी चूक कुणाची आहे, हे पहाणेही महत्त्वाचे आहे. वजन वाढणे ही सर्वांत मोठी चूक असे समजायला काही हरकत नाही.
भारतीय क्रीडा व्यवस्थापनाची बेफिकिरी !
व्यवस्था आणि नियम यांस गांभीर्याने न घेण्याची वृत्ती, मानसिकता, शास्त्रकाट्याच्या कसोट्यांपेक्षा उत्स्फूर्ततेवर वेळ मारून नेण्याची वृत्ती आणि या सगळ्यांच्या जोडीला याच दुर्गुणांनी युक्त भारतीय क्रीडा व्यवस्थापनाची बेफिकिरी, हीच अशा घटनांना उत्तरदायी आहे. विनेश ज्या वजनी गटात खेळत होती, त्या गटात स्पर्धेआधी आणि नंतर वजनात किमान अन् कमाल किती फेरफार खपवून घेतला जातो, याचे नियम ऑलिंपिक स्पर्धेआधीच निश्चित केले गेलेले असतात आणि इतक्या उच्च दर्जाच्या स्पर्धांत हे नियम कसोशीने पाळण्यासाठी काय दक्षता घ्यायला हवी, हेही विनेश अन् त्यापेक्षा तिच्या व्यवस्थापकांना ठाऊक असते. निदान तसे अपेक्षित असते. इतक्या उंचीवर स्पर्धक गेल्यावर त्याच्यासमवेत मानसोपचारतज्ञासह आहार-विहारतज्ञही असतो. स्पर्धा काळात काय खावे ? काय खाऊ नये ? याचे नियमही या सर्वांना ठाऊक असतात. अशा स्पर्धांत एक फेरी संपल्यानंतर आणि पुढच्या फेरीच्या आधी वजन, अमली पदार्थ सेवन आदी चाचण्या होतात, याचीही माहिती या सर्वांना असते. असे असतांनाही विनेशचे वजन वाढू देण्याइतकी चूक या सर्वांकडून होतेच कशी ? २ किलोंनी वाढलेल्या वजनांतील एक किलो आणि अनुमाने ९०० ग्राम तिने रात्रभर घाम गाळून अल्प केले. तरीही तिचे वजन कमाल वजनापेक्षा १०० ग्रॅमने अधिक भरले. साहजिकच अंतिम फेरीसाठी ती अपात्र ठरली. कमाल मर्यादा जर ५० किलोची आहे, तर स्पर्धकाचे वजन त्या आत हवे, हे अधोरेखित आहे. असे असतांना ते विहित मर्यादेपेक्षा ‘केवळ १०० ग्रॅम’ अधिक असल्यास ‘गोड मानून’ घ्यायला हवे, असे वाटतेच कसे ?
शास्त्रकाट्याच्या अचूक, नेमक्या कसोटीस सामोरे जाण्याची आपली मानसिकता का नाही ? स्पर्धकांस खेळाकडे लक्ष देता यावे; म्हणून तर व्यवस्थापकादी मंडळीचा इतका फौजफाटा त्यांच्या दिमतीला असतो. ते या प्रकरणात काय करत होते ? हे सर्व सरकारी अधिकारी ! छोट्या छोट्या देशांतील खेळाडू जर ऑलिंपिकमध्ये मोठी कामगिरी करत असतील, तर १५० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतानेही अशी कामगिरी का करू नये ? केंद्र सरकारकडून सर्व सुविधा आणि साहाय्य मिळत असतांनाही केवळ व्यवस्थापक अन् खेळाडू या दोघांच्या गंभीर चुकांमुळे जगभरात देशाची नाचक्की होत असेल, तर या दोघांना जनता कधीही क्षमा करणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे.
ऑलिंपिक स्पर्धेत भारताची निराशाजनक कामगिरी !
पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताची मोहीम सुवर्णपदकाविना संपली. भारताने एकूण ६ पदके जिंकली. टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताने १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदके जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघ पदकतालिकेत ४८ व्या क्रमांकावर होता. या वेळी भारतीय संघ ७१ व्या स्थानावर घसरला आहे. टोकियोच्या तुलनेत पॅरिस ऑलिंपिकच्या पदकतालिकेत भारताची घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे सुवर्णपदक न जिंकणे ! भारताला केवळ एक रौप्य पदक मिळाले, जे भालाफेकीत नीरज चोप्राने जिंकले. भारताची पाचही पदके कांस्य आहेत. यांपैकी ३ कांस्यपदके नेमबाजीत जिंकली. हॉकीमध्ये १ कांस्यपदक आणि कुस्तीमध्ये १ कांस्यपदक जिंकले आहे.
क्रीडा संस्कृती रुजायला हवी !
जगात ऑलिंपिक स्पर्धा सर्वांत मोठी स्पर्धा मानली जाते. क्रीडा किंवा विविध खेळ हे आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनले आहेत. भारतात अनेक खेळ आणि उत्तम खेळाडू आहेत; मात्र ऑलिंपिकसारखी एखादी मोठी स्पर्धा आल्यावरच आपल्याकडे भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा होते. त्यानंतर काय ? त्यापुढील स्पर्धेची सिद्धता आपण करतो का ? याचा विचार व्हायला हवा. तळागाळातून खेळाडूंचा शोध घ्यायला हवा. त्यांच्या गुणवत्तेला पैलू पाडण्यासाठी त्यांना अत्याधुनिक सुविधा पुरवायला हव्यात. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना अनुभव मिळायला हवा, तरच भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर यश येईल. आपल्याकडे अजूनही क्रीडा संस्कृती रुजलेली नाही. पालक मुलांना शाळेपर्यंतच एखाद्या खेळात खेळू देतात. महाविद्यालयात याच खेळाडूला अभ्यासाच्या मागे धावायला भाग पाडले जाते. मग त्या विद्यार्थ्यामधील खेळाडू संपून जातो. अजूनही मुलांना खेळायला मोकळे मैदान उपलब्ध होत नाही. मोकळी जागा मिळाली की, तेथे निवासी इमारती बांधल्या जातात किंवा मॉल उभारले जातात. मग कसे घडतील खेळाडू ? खेळाडू घडवण्यासाठी गुंतवणूक महत्त्वाची आहे. ही गुंतवणूक करण्यासाठी केंद्रशासनाने विशेष लक्ष दिले पाहिजे, अशीच जनतेची अपेक्षा आहे.
सर्व सुविधा आणि साहाय्य मिळत असतांनाही गंभीर चुकांमुळे क्रीडास्पर्धेत देशाची जगभरात नाचक्की होणे दुर्दैवी ! |