१.८.२०२४ या दिवशी बेळगाव येथील सौ. अर्चना लिमये (वय ६५ वर्षे) यांचे निधन झाले. १३.८.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्या निमित्त साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात जाणवलेले पालट, तसेच त्यांच्या आजारपणात आणि निधनाच्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. सौ. प्रचीती हळदणकर, बेळगाव, कर्नाटक.
१ अ. आदर्श दिनचर्या : ‘लिमयेकाकू पहाटे उठून नामजप करायच्या. नंतर त्या चालायला जायच्या. त्या वेळेतच जेवत आणि झोपत असत.
१ आ. प्रेमभाव
१. काकू प्रत्येक साधकाची प्रेमाने आणि आपुलकीने विचारपूस करायच्या. त्या घरी आलेल्या साधकांचे प्रेमाने आदरातिथ्य करायच्या
२. काकूंनी विज्ञापनदाते, अर्पणदाते आणि वाचक यांनाही प्रेमाने जोडून ठेवले होते.
१ इ. काकू व्यष्टी साधनेचे प्रयत्न तळमळीने करायच्या.
१ ई. सेवेची तळमळ
१. काकू प्रतिदिन ५ – ६ घंटे समष्टी सेवा करायच्या. त्यांना कोणतीही सेवा दिली, उदा. वर्गणीदारांचे नूतनीकरण करणे, विज्ञापने आणि अर्पण गोळा करणे इत्यादी, तरी ती सेवा त्या मनापासून करायच्या.
२. त्यांना मधुमेह असल्याने त्या सेवा करतांना नेहमी स्वतःजवळ खाऊ ठेवायच्या. ‘मला शारीरिक व्याधी आहेत; म्हणून मला सेवेला जायला जमणार नाही’, असे कारण त्यांनी कधीच सांगितले नाही.
३. काही दिवसांपूर्वी काकूंचे शस्त्रकर्म झाले होते. त्यानंतर त्यांना पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितली होती. त्या वेळीही त्यांनी भ्रमणभाषवरून २५ जिज्ञासूंना संपर्क करून त्यांना गुरुपौर्णिमेचे निमंत्रण दिले.’
२. कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांवर दृढ श्रद्धा असणे : ‘काकूंची सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांवर दृढ श्रद्धा होती. मागच्या वर्षी त्यांचे यजमान रुग्णाईत असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले होते. त्यांची प्रकृती पुष्कळ खालावली होती. याविषयी सांगतांना काकू म्हणाल्या, ‘‘गुरुदेव प्रत्येक पावलाला माझ्या समवेत होते. त्यामुळे मला ताण, भीती आणि काळजी वाटली नाही.’’
२ आ. जाणवलेले पालट : या वर्षी मे मासात मी काकूंना भेटले. तेव्हा मला त्यांच्यात पुढील पालट जाणवले.
१. काकूंचा तोंडवळा प्रसन्न होता. त्या स्वतः आनंद अनुभवत असल्याने त्यांच्याशी बोलतांना मलाही आनंद जाणवत होता.
२. काकूंमधील अपेक्षांचे प्रमाण न्यून झाले होते.
३. काकू मला त्यांच्या यजमानांच्या आजारपणाविषयी सांगत होत्या. तेव्हा त्या भावनाशील झाल्या नाहीत. काकूंमध्ये स्थिरता जाणवत होती.
४. व्यक्ती आणि परिस्थिती यांना स्वीकारण्याची त्यांच्या मनाची सिद्धता झाली होती. त्यामुळे व्यक्ती अथवा परिस्थिती यांना दोष न देता त्या सकारात्मक राहून उपाययोजना काढण्याचा प्रयत्न करत होत्या.
२ इ. रुग्णाईत असतांना जाणवलेली सूत्रे
१. २७.७.२०२४ या दिवशी काकू रुग्णालयात भरती असल्याचे समजल्यावर मी त्यांना भ्रमणभाष केला. तेव्हा ‘त्या स्वतःच्या प्रकृतीविषयी त्रयस्थपणे सांगत आहेत’, असे मला जाणवले.
२. काकूंमध्ये भाववृद्धी झाल्याचे जाणवले.
३. त्यांच्या घरातील श्रीकृष्णाचे चित्र आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे छायाचित्र यांत पालट झाला असून ही दोन्ही चित्रे सजीव झाली आहेत.’
३. श्री. काशीनाथ शेट्टी (वय ६३ वर्षे), बेळगाव, कर्नाटक.
अ. ‘एकदा काकू पडल्या होत्या. तेव्हाही त्या स्वतःचा विचार न करता ग्रंथप्रदर्शनावर सेवेला आल्या होत्या.
आ. सेवा करतांना काकूंकडून काही चुका झाल्या, तर काकू स्वतःहून त्या चुका सांगायच्या, तसेच त्या अन्य साधकांच्याही चुका सांगायच्या.
इ. काकू सगळ्यांना साधना सांगायच्या. त्यांच्या घरी घरकामात साहाय्य करणार्या बाईंनाही काकूंनी साधना सांगितली होती. काकू त्यांना ग्रंथप्रदर्शनावर सेवेलाही घेऊन येत असत.’
४. श्री. आबासाहेब (बापू) सावंत (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५४ वर्षे), बेळगाव, कर्नाटक.
४ अ. व्यवस्थितपणा : ‘काकूंचा हा गुण त्यांच्या घरी आणि प्रसारसेवेतही आम्हाला अनुभवायला मिळायचा. त्यांच्या घरी प्रसारसाहित्य एका ठिकाणी नीट ठेवलेले असायचे. त्यामुळे त्यांच्या घरात चांगली स्पंदने येतात.
४ आ. स्थिरता : आम्ही काकूंना भेटायला रुग्णालयात गेलो. तेव्हा काकू स्थिर वाटत होत्या. त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘त्या रुग्णाईत आहेत’, असे वाटत नव्हते. त्यांच्या खोलीत चैतन्य जाणवत होते.’
४ इ. जाणवलेला पालट : ‘काकूंनी विचारून सेवा करणे आणि सूत्रे समजून घेणे’, हे गुण वाढवण्याचा प्रयत्न केला.’
५. श्री. आबासाहेब (बापू) सावंत (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५४ वर्षे), सौ. अर्चना घनवट, सौ. आशा कागवाड, सौ. प्रचीती हळदणकर, श्री. सुधीर हेरेकर आणि श्री. परशुराम गोरल, बेळगाव.
५ अ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१. ‘१.८.२०२४ या दिवशी काकूंचे निधन झाल्यानंतर आम्ही रुग्णालयात गेलो. ‘त्यांना शवागारातून आणणार आहेत’, असे आम्हाला कळल्यानंतर आम्ही ६ साधक तेथे जाऊन थांबलो. रुग्णालयात दाब जाणवत होता; पण काकूंना रुग्णशिबिकेवरून (‘स्ट्रेचर’वरून) तेथे आणल्यानंतर वातावरणात अकस्मात् पालट होऊन हलकेपणा जाणवू लागला.
२. काकूंचा चेहरा तेजस्वी दिसत होता.
३. आम्ही सर्वांनी काकूंच्या भोवती दत्ताच्या नामपट्टया ठेवल्या आणि त्यांच्या संपूर्ण देहाला अत्तर लावले. त्यानंतर आम्ही मोठ्याने जयघोष आणि २ मिनिटे दत्ताचा नामजप केला. हे सर्व करत असतांना आम्हा सगळ्यांना पुष्कळ शांत वाटत होते.
४. ‘काकू पुष्कळ आनंदी आहेत आणि गुरुदेवांच्या अनुसंधानात आहेत’, असे आम्हाला जाणवले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आम्ही हे सगळे अनुभवू शकलो’, याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |