मुरगाव – यंदा मुरगाव येथील श्री दामोदर भजनी सप्ताह १२५ वर्षे पूर्ण करत आहे. १० ऑगस्ट या दिवशी जांबावली येथील श्री दामोदरदेवाकडून आलेले श्रीफळ दुपारी १२ वाजता मुरगाव येथील जोशी यांच्या घरातील श्री दामोदरदेवासमोर ठेवून अत्यंत उत्साहात दुपारी १२.३० वाजता भजनी सप्ताहाला प्रारंभ झाला. जोशी घराण्यातील श्री. प्रशांत जोशी यांच्या हस्ते देवासमोर श्रीफळ ठेवण्यात आले.
११ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत गोपाळकाला होईल आणि त्यानंतर दुपारी १२.३० वाजता भजनी सप्ताहाची समाप्ती होईल. या निमित्ताने सनातन संस्थेने येथील स्वातंत्र्य मार्गावरील हॉटेल लापाझ गार्डनसमोर सनातनच्या ग्रंथांचा कक्ष उभारला आहे.
या कक्षाचे उद्घाटन विश्व हिंदु परिषदेचे मंत्री श्री. संजीव कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणाले, ‘‘सनातनच्या ग्रंथकक्षावर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध आहेत. सनातन धर्मावर होणार्या आघातांविषयी माहिती देणारी पुस्तके आहेत. त्याचप्रमाणे पूजेसाठी लागणारी शुद्ध आणि सात्त्विक सामग्री (सनातनची उत्पादने) उपलब्ध आहे. आज सनातन संस्कृती आणि परंपरा नवीन पिढीपर्यंत पोचवणे आवश्यक आहे. सनातन धर्मावर होणारे आघात तरुण पिढीला समजले पाहिजेत; म्हणून या कक्षाला भेट द्या आणि ग्रंथ खरेदी करा. याद्वारे सनातनचे कार्य पुढे नेण्यास साहाय्य होईल.’’