म्हापसा, १० ऑगस्ट (वार्ता.) – कळंगुट पंचायतीने नुकतेच बागा येथील अनधिकृत डान्स बारचे बांधकाम भूईसपाट केले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात यापूर्वी जनहित याचिका प्रविष्ट केलेले कार्यकर्ते सुदेश मयेकर आणि कुंदन केरकर यांनी कळंगुट येथील अन्य अनधिकृत डान्स बार पाडण्याची मागणी केली आहे. सुदेश मयेकर आणि कुंदन केरकर यांनी विनाअनुज्ञप्ती चालू असलेल्या आणि अनैतिक व्यवसायात गुंतलेल्या १३ अनधिकृत डान्सबारच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली होती.
कळंगुट पंचायतीने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सुदेश मयेकर आणि कुंदन केरकर म्हणाले, ‘‘कळंगुट पंचायतीने निदान एका अनधिकृत डान्सबारचे बांधकाम भूईसपाट केले, ही पंचायतीची अभिनंदनीय कृती आहे. यामुळे पंचायत कळंगुट परिसरात अशी अनधिकृत कृत्ये खपवून घेणार नाही, असा संदेश गेला आहे. शहर आणि नगरनियोजन खात्याच्या अधिकार्यांनी ९ ऑगस्ट या दिवशी न्यायालयाच्या आदेशावरून एका टाळे ठोकलेल्या डान्सबारच्या परिसराची पहाणी केली. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची अनुज्ञप्ती नसल्याने संबंधित डान्सबारला टाळे ठोकले होते.’’