नागपूर – पूर्वी हिंदूंना किमान २ मुले असायची. कालांतराने एक मूल झाले. आता ‘लिव्ह इन रिलेशन’मुळे (विवाह न करता स्त्री आणि पुरुष एकत्र रहातात त्याला ‘लिव्ह इन रिलेशन’ असे म्हणतात) मूल होऊ न देण्याकडे कल आहे. असेच चालू राहिले, तर हिंदु अल्पसंख्यांक होतील. हे लक्षात घेता बांगलादेशासारखी स्थिती होऊ द्यायची नसेल, तर हिंदूंनी किमान २ मुले जन्माला घालावी, असे आवाहन विश्व हिंदु परिषदेच्या महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी येथे ८ ऑगस्ट या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. या वेळी विदर्भ प्रांत मंत्री प्रशांत तितरे, निरंजन रिसालदार उपस्थित होते.
गोविंद शेंडे पुढे म्हणाले की, फाळणीच्या वेळी बांगलादेशातील हिंदूंची संख्या ३२ टक्के होती. आता ती ८ टक्क्यांहून न्यून झाली आहे. त्यामुळे तेथील हिंदूंवर आज अत्याचार होत आहेत. तेथील हिंदु सतत जिहादी अत्याचाराला बळी पडत आहेत. त्यामुळे प्रत्येक हिंदूने किमान २ अपत्ये जन्माला घातली पाहिजे. तरच देश सुरक्षित राहिल. ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ कायम राहिले, तर आपल्याकडे हिंदु अल्पसंख्यांक होतील. हिंदूची संख्या अधिक असेल तरच लोकतंत्र टिकेल, अन्यथा भारतातही बांगलादेशासारखी परिस्थिती निर्माण होईल.
सध्या बांगलादेश हिंसा आणि अराजकतेने ग्रासला आहे. तेथील पंतप्रधानांनी त्यागपत्र दिल्यानंतर आणि देश सोडून गेल्यानंतर अराजकतावादी अधिक प्रबळ झाले असून कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कुचकामी झाली आहे. या गोंधळाच्या परिस्थितीत तेथील अतिरेकी जिहादी घटकांनी हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार चालू केले आहेत. बांगलादेशामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हिंदु अल्पसंख्यांकांची धार्मिक स्थळे, व्यापारी प्रतिष्ठाने आणि घरे यांची हानी करण्यात आली. हे भयंकर कृत्य बांगलादेशातील प्रत्येक जिल्ह्यात घडत आहे. मंदिरांची मोठी हानी झाली आहे. जगभरातील शोषित आणि विस्थापित लोकांना साहाय्य करणे ही आपली परंपरा राहिली आहे. याकडे भारत दुर्लक्ष करू शकत नाही. बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने शक्य ती सर्व पावले उचलावीत. अशा बिकट परिस्थितीचा लाभ घेत जिहादी सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतात. याविषयी सावध रहाणे आवश्यक आहे.