विरोधकांना अडकवण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून अनिल देशमुख यांना आदेश !

माजी पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांचा खळबळजनक गंभीर आरोप !

मुंबई – महाविकास आघाडीच्या काळात देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन आदींना अटक करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून आदेश होता, असा धक्कादायक खुलासा महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांनी केला आहे. ९ ऑगस्ट या दिवशी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

या वेळी परमवीर सिंह म्हणाले, ‘‘अनिल देशमुख यांना त्यांच्या पक्षाने पैसे वसुलीचे ‘टार्गेट’ (लक्ष्य) दिले होते. यामध्ये केवळ मुंबईतून १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगण्यात आले होते. या व्यतिरिक्त राज्यातील वसुली वेगळी होती. अनिल देशमुख यांचा मुलगा सलिल देशमुख, कुंदन शिंदे आणि अन्य सहकारी हे ‘ललित’ हॉटेलवर उद्योजक, अधिकारी यांना बोलावून त्यांच्यासमवेत वसुलीचा व्यवहार करत होते. हा विषय माझ्या लक्षात आल्यावर मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील आणि अनिल परब यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितला; मात्र त्यांना याविषयी आधीपासूनच माहिती असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. वर्ष २०२० मध्ये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून १० पोलीस अधिकार्‍यांचे स्थानांतर करण्यात आले होते. हे स्थानांतर मुख्यमंत्री कार्यालयातून थांबवण्यात आले. त्यानंतर ३-४ दिवसांमध्येच पुन्हा त्याच ठिकाणी त्या अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. अधिकार्‍यांकडून पैसे घेण्यासाठी ही पद्धत वापरण्यात आली. याविषयीचे पुरावे मी न्यायालय, केंद्रीय अन्वेषणयंत्रणा आणि सक्त वसूली संचालनालय यांच्याकडे दिले आहेत.’’

शरद पवार यांच्या सांगण्यावरून गुन्हा नोंदवण्यासाठी बैठकीचे आयोजन !

गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी अनिल देशमुख यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला अनिल गोटे, प्रवीण चव्हाण हेही उपस्थित होते. शरद पवार यांच्या सांगण्यावरून ही बैठक बोलावण्यात आली होती. जयंत पाटील यांच्या सांगलीतील विरोधकांवरही गुन्हा नोंदवण्यासाठी माझ्यावर दबाव आणण्यात आला. महाविकास आघाडीकडून राजकीय विरोधकांवर गुन्हा नोंदवण्यासाठी माझ्यावर दबाव आणण्यात आला; मात्र मी नकार दिला. याचे मुख्य सूत्रधार अनिल देशमुख होते; मात्र त्यांना ‘मातोश्री’ आणि ‘सिल्व्हर ओक’ येथून आदेश होते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठ्या कलाकारांवर दबाव आणण्यासाठी अनिल देशमुख प्रयत्नरत होते, असेही परमवीर सिंह यांनी म्हटले.