Vinesh Phogat : भारतीय कुस्‍तीपटू विनेश फोगट यांचे वजन अधिक असल्‍याने अपात्र !

  • पॅरिस ऑलिंपिक २०२४

  • अंतिम सामना खेळू शकणार नाहीत, किमान रौप्‍यपदक मिळण्‍याच्‍या भारतीय आशांवर पाणी !

विनेश फोगट

पॅरिस (फ्रान्‍स) – पॅरिस ऑलिम्‍पिक(Paris Olympics) २०२४ मध्‍ये महिला कुस्‍तीच्‍या ५० किलो वजनी गटाच्‍या अंतिम सामन्‍यापूर्वी विनेश फोगट(Vinesh Phogat) यांना अपात्र ठरवण्‍यात आले आहे. केवळ १०० ग्रॅम वजन अधिक असल्‍याने त्‍यांना अंतिम सामन्‍यापूर्वी अपात्र घोषित करण्‍यात आले. ६ ऑगस्‍टला उपांत्‍य फेरीत त्‍यांनी क्‍युबाच्‍या लोपेझ गुझमन यांचा ५-० असा सरळ पराभव केला होता. यामुळे ऑलिंपिकच्‍या इतिहासात अंतिम फेरीत पोचणार्‍या फोगाट या पहिल्‍या भारतीय महिला कुस्‍तीपटू ठरल्‍या होत्‍या.

भारतीय ऑलिंपिक संटघनेने यासंदर्भात सांगितले की, विनेश फोगट यांना महिला कुस्‍तीच्‍या ५० किलो गटातून अपात्र ठरवण्‍यात आल्‍याचे भारतीय संघाला दु:ख झाले आहे. आम्‍ही तिचे वजन अल्‍प होण्‍यासाठी रात्रभर सर्वतोपरी प्रयत्न केले. तिने पुष्‍कळ वेळ सायकलही चालवली, तरीही वजन अल्‍प होऊ शकले नाही.

या घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्‍हटले की, विनेश तू चॅम्‍पियन्‍समध्‍ये चॅम्‍पियन आहेस ! तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्‍येक भारतियासाठी प्रेरणा आहेस. आजचे अपयश दुखावते. मला वाटत असलेली निराशा मी शब्‍दांत व्‍यक्‍त करू शकत नाही.