Bangladesh Hindu Attack : बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात आक्रमणे – २ हिंदु नगरसेवकांची हत्‍या

  • ४ मंदिरांची तोडफोड

  • २७ जिल्‍ह्यांत हिंदूंवर आक्रमणे

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात ४ ऑगस्‍टपासून पुन्‍हा चालू झालेल्‍या हिंसाचारामध्‍ये हिंदूंच्‍या ४ मंदिरांची तोडफोड करण्‍यात आली, तसेच अनेक हिंदूंवर आक्रमणे झाली असून यात २ हिंदू ठार झाले आहेत. या आक्रमणांचे व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित झाले आहेत. ढाका येथील भारतीय सांस्‍कृतिक केंद्राची तोडफोड करण्‍यात आली. पंतप्रधान शेख हसीना यांची सत्तेवरून हकालपट्टी झाल्‍यानंतर निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्‍थिती पहाता हिंदु समाजातील काही नेते घाबरले आहेत. बांगलादेशातील हिंदूंना शेख हसीना यांच्‍या अवामी लीगचे समर्थक मानले जाते.

१. बांगलादेशातील वृत्तपत्र ‘डेली स्‍टार’च्‍या वृत्तानुसार परशुराम थाना अवामी लीगचे सदस्‍य आणि रंगपूर सिटी कॉर्पोरेशनचे प्रभाग ४ चे नगरसेवक हरधन रॉय यांची गोळ्‍या झाडून हत्‍या करण्‍यात आली. रंगपूरमधील दुसरे नगरसेवक काजल रॉय यांचाही हिंसाचारामध्‍ये मृत्‍यू झाला.

२. ‘हिंदू बौद्ध ख्रिश्‍चन युनिटी कौन्‍सिल’च्‍या नेत्‍या काजोल देबनाथ यांनी सांगितले की, देशभरात किमान ४ हिंदु मंदिरांची हानी करण्‍यात आल्‍याची माहिती मिळाली आहे. खानसामा उपजिल्‍हामध्‍ये ३ हिंदूंच्‍या घरांवर आक्रमणे करण्‍यात आली.

३. बांगलादेशातील २७ जिल्‍ह्यांमध्‍ये हिंदूंची घरे आणि दुकाने यांना लक्ष्य करण्‍यात आले आहे. मौल्‍यवान वस्‍तू लूटल्‍या आहेत. लालमोनिरहाट सदर उपजिल्‍हामध्‍ये धार्मिक हिंदू कार्यक्रमांशी संबंधित पूजा समितीचे सचिव प्रदीप चंद्र रॉय यांच्‍या घराची तोडफोड आणि लूटमार करण्‍यात आली आहे.

४. मुसलमान दंगलखोरांनी पालिका सदस्‍य मुहीन रॉय यांच्‍या दुकानाची तोडफोड करून लूटमार केली. कालीगंज उपजिल्‍हातील चंद्रपूर गावात ४ हिंदु कुटुंबांच्‍या घरांची तोडफोड करून ती लूटण्‍यात आली आहेत. हातीबंधा उपजिल्‍ह्यातील पुर्बो सरदुबी गावात १२ हिंदूंची घरे जाळण्‍यात आली आहेत.

५. पंचगढमध्‍ये अनेक हिंदूंच्‍या घरांची तोडफोड आणि लूटमार करण्‍यात आली आहे. ओक्‍य परिषदेचे सरचिटणीस मोनिंद्र कुमार नाथ म्‍हणाले की, असे कोणतेही क्षेत्र किंवा जिल्‍हा शेष नाही जेथे हिंदूंवर आक्रमणे झाली नाहीत. वेगवेगळ्‍या भागांतून सातत्‍याने आक्रमणाची माहिती मिळत आहे.

६. हिंदूंना घरातून हाकलून मारले जात आहे. हिंदू भीतीच्‍या छायेत जगत आहेत. दिनाजपूर शहर आणि इतर उपजिल्‍हे येथे १० हिंदूंच्‍या घरांवर आक्रमणे करण्‍यात आल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. दिनाजपूर शहरातील रेलबाजारहाट येथील मंदिराचीही तोडफोड केली.

७. लक्ष्मीपूर येथील गौतम मजुमदार म्‍हणाले की, २०० ते ३०० हून अधिक आक्रमणकर्त्‍यांनी आमची २ मजली इमारत पेटवून दिली.

८. खुलनामध्‍ये बिमान बिहारी अमित आणि अनिमेश सरकार यांच्‍या घरांची तोडफोड करण्‍यात आली. रूपशा पोलीस ठाण्‍यांतर्गत येणार्‍या हैसगाटी गावातील श्‍यामल कुमार दास आणि स्‍वजन कुमार दास यांच्‍या घरांवरही आक्रमण करून लूटण्‍यात आली.

बांगलादेशातील सैन्‍याने हिंदूंचे रक्षण करावे ! – शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद

शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद

ज्‍योतिष पीठाचे शंकराचार्य अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती यांनी बांगलादेशातील घटनेवर प्रतिक्रिया व्‍यक्‍त करतांना म्‍हटले की, बांगलादेशातील राजकीय गोंधळाची माहिती आम्‍हाला मिळाली आहे. बांगलादेशात सैनिकी राजवट आहे. नागरिकांच्‍या सुरक्षेसाठी सैन्‍य त्‍याचे कर्तव्‍य निश्‍चितपणे पार पाडेल, अशी आशा आहे. बांगलादेशात ८ टक्‍के हिंदू रहातात. त्‍यांची सुरक्षा महत्त्वाची आहे; म्‍हणून आम्‍ही बांगलादेशातील सैन्‍याला याची निश्‍चिती करण्‍यास सांगू इच्‍छितो.

भारताने बांगलादेशाची रेल्‍वे सेवा स्‍थगित केली

बांगलादेशातील परिस्‍थिती पहाता भारतीय रेल्‍वेने बांगलादेशला जाणार्‍या सर्व गाड्या अनिश्‍चित काळासाठी स्‍थगित केल्‍या आहेत. रेल्‍वे मंत्रालयाने दिलेल्‍या माहितीनुसार मैत्री एक्‍सप्रेस, बंधन एक्‍सप्रेस आणि मिताली एक्‍सप्रेस बांगलादेशातील हिंसक निदर्शनांमुळे आधीच रहित करण्‍यात आल्‍या होत्‍या; मात्र आता ही रहित करण्‍याची मुदत अनिश्‍चित काळासाठी वाढवण्‍यात आली आहे.

संपादकीय भूमिका 

बांगलादेशातील हिंदूंचा निर्वंश होईपर्यंत हे चालूच रहाणार आहे; कारण तेथील हिंदूंमध्‍ये प्रतिकार करण्‍याची क्षमता नाही, भारतातील धर्मनिरपेक्ष सरकार कधीही साहाय्‍य करणार नाही आणि जागतिक समुदाय त्‍यांच्‍याकडे ढुंकूंनही पहाणार नाही !