SC On Dara Singh Plea : सर्वोच्च न्यायालयात दारा सिंह यांच्या सुटकेच्या मागणीवर सुनावणी

  • वर्ष १९९९ मध्ये ख्रिस्ती मिशनरी आणि त्याची मुले यांना जाळल्याचे प्रकरण

  • ओडिशा सरकार आणि ‘सीबीआय’ कडून मागितले उत्तर  

दारा सिंह

नवी देहली – ऑस्ट्रेलियन ख्रिस्ती मिशनरी ग्राहम स्टुअर्ट स्टेन्स आणि त्यांची २ मुले यांच्या हत्येच्या प्रकरणी दोषी ठरलेल्या दारा सिंह यांच्या सुटकेची मागणी करणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ६ जानेवारी या दिवशी सुनावणी झाली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ओडिशा सरकार आणि ‘सीबीआय’ यांच्याकडून उत्तर मागितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना ४ आठवड्यांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. या खून प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’ने केली असल्याने सर्वोच्च न्यायालयाने ‘सीबीआय’ला पक्षकार बनवण्याचा आदेश दिला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ओडिशा सरकारला दारा सिंह यांच्या सुटकेचा विचार करणार्‍या पाच समित्यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी दारा सिंह यांचे अधिवक्ता विष्णु जैन यांनी असा युक्तीवाद केला की, दारा सिंह आता ६१ वर्षांचे आहेत आणि त्यांना कारागृहातील २५ वर्षांत कधीही पॅरोल (संचित रजा) मिळाला नाही. जेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले, तेव्हा त्यांना अंत्यसंस्कारालाही उपस्थित रहाण्याची अनुमती देण्यात आली नव्हती.

काय आहे प्रकरण ?

वर्ष १९९९ मध्ये ओडिशाच्या केओंझार जिल्ह्यात ग्राहम स्टेन्स आणि त्यांची २ मुले यांना जिवंत जाळल्याची घटना समोर आली होती. या हत्याकांडातील प्रमुख आरोपी तथा बजरंग दलाचे कार्यकर्ते दारा सिंह यांना वर्ष २००३ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. वर्ष १९९९ पासून ते कारागृहात आहेत आणि आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सुटका करण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे.