‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’च्या वतीने चातुर्मासानिमित्त प्रवचन
पुणे – सध्या महाराष्ट्रात चाललेल्या जातीयवादामुळे ज्ञानोबा-तुकोबा यांचे विचार आपण मारत आहोत. जातीयवादाला खतपाणी घातल्याने महाराष्ट्र संपू शकतो; परंतु महाराष्ट्र हा विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा यांचा आहे. त्यामुळे जातीयवादासारखी कितीही आव्हाने आली तरी ती आपण परतवून लावल्याने आजही महाराष्ट्र समानतेच्या पातळीवर उभा राहिला आहे, असे मत श्री क्षेत्र भंडारा डोंगर जगद्गुरु कृपांकित डॉ. पंकज उपाख्य चेतनानंद महाराज यांनी व्यक्त केले. ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’ आणि ‘सुवर्णयुग तरुण मंडळा’च्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन आणि कीर्तन महोत्सवाच्या सहाव्या दिवशी ‘ज्ञानोबा-तुकोबांचे पंढरी माहात्म्य’ या विषयावर ते बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.