‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’ आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन !
पुणे – संसार आणि परमार्थ दोन्ही करतांना तुमचे कल्याण होऊ शकते, अनन्यभावाने ईश्वराला सामोरे जा, हे सांगणारा वारकरी संप्रदाय एकमेव आहे. वारकरी संप्रदाय समजून घ्यायचा असेल, तर संतश्रेष्ठ ज्ञानदेव, जगद़्गुरु संत एकनाथ आणि संत तुकोबा यांचे विचार समजून घ्यावे लागतील, असे मत श्री क्षेत्र भंडारा डोंगर जगद़्गुरु कृपांकित डॉ. पंकज उपाख्य चेतनानंद महाराज यांनी व्यक्त केले. ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’ आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन अन् कीर्तन महोत्सवाच्या पाचव्या दिवशी ‘ज्ञानोबा-तुकोबांचे पंढरी माहात्म्य’ या विषयावर ते बोलत होते. स्वारगेट येथील ‘गणेश कला क्रीडा मंच’ येथे प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
चेतनानंद महाराज पुढे म्हणाले की, पंढरीचे माहात्म्य समजून घेण्यासाठी संतांचे भाव समजून घ्यावे लागतील. ज्ञानोबांचा भाव आहे, ‘भूता परस्परे जडो मैत्र जिवांचे’, संत एकनाथ यांचा भाव ‘एका जनार्दनी’, तर ‘कोणा ही जिवाचा न घडो मत्सर’ हा जगद़्गुरु संत तुकाराम महाराज यांचा भाव आहे.
जगद़्गुरु संत तुकाराम आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांचे चरित्र ऐकण्याची संधी !
प्रवचनात श्री ज्ञानोबा-तुकोबांविषयी इतिहास आणि परंपरा, मानसशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान, पंढरी माहात्म्य, नीतीशास्त्र, पसायदान यांविषयी चेतनानंद महाराज निरुपण करणार आहेत. विश्वमाऊली ज्ञानोबाराय आणि जगद़्गुरु तुकोबाराय यांचे जीवन समृद्ध करणारे चरित्र अन् तत्त्वज्ञान यानिमित्ताने ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.