इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – विश्व हिंदु परिषद-बजरंग दलाचे नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या इचलकरंजी येथील नागरिकांसाठी सेवाकार्य करण्यात येत आहे. पूरस्थितीमुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांना अन्न मिळण्यासाठी ‘कै. शेळके सांस्कृतिक भवन’ येथे ‘केंद्रीय भोजनकक्ष’ चालू करण्यात आला आहे. येथे स्थलांतरित झालेल्या २१० जणांना दोन वेळचा महाप्रसाद, चहा आणि एक वेळचा अल्पाहार देण्यात येत आहे. ‘दुर्गा वाहिनी’च्या माध्यमातून अन्नछत्रामधील नागरिकांचे मनोबल वाढावे, यासाठी कीर्तन-प्रवचन घेण्यात येत आहे. महिलांची आरोग्य पडताळणी करण्यात येत असून लहान मुलांसाठीही विविध खेळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सदर सेवाकार्यासाठी समाजातील दानशूर संस्था, व्यक्ती यांनी धान्य स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात साहाय्य करावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. या नियोजनात सर्वश्री सुजित कांबळे, मुकेश चौथे, सर्जेराव कुंभार, सोमेश्वर वाघमोडे, प्रवीण सामंत, दिगंबर भिलुगुडे, अमोल शिरगुप्पे, तेजस कडव, अमित कुंभार यांसह अन्य कार्यकर्ते सहभागी आहेत.