डिचोली, ३१ जुलै (वार्ता.) – येथे बुधवारच्या साप्ताहिक बाजाराच्या दिवशी बाजारात जिवंत (वीजप्रवाह चालू असलेली) वीजवाहिनी तुटून पडली; मात्र ही वीजवाहिनी ताडपत्रीला अडकल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. वीजवाहिनीच्या स्पर्शाने ताडपत्रीने पेट घेतला. ही घटना ३१ जुलै या दिवशी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आणि या घटनेमुळे बाजारात गोंधळ उडाला.
सकाळी अचानक जोरदार वादळी वारा सुटला आणि बाजारातील विक्रेत्यांनी आसर्यासाठी लावलेल्या ताडपत्र्या उडाल्या. येथील गणपतिपूजन मंडपाजवळील फळभाजी बाजारात जाणार्या रस्त्यावरील जंक्शनवर एका महिला विकेत्याने बांधलेली ताडपत्री उंचावर उडाली आणि ती वरील वीजवाहिन्यांत अडकली. ताडपत्री जोरात खाली येतांना एक प्रवाहित वीजवाहिनी तुटली. वीजवाहिनी ताडपत्रीला अडकून राहिली आणि वीजवाहिनीच्या स्पर्शाने ताडपत्रीने पेट घेतला. ही घटना घडली तेव्हा पालिकेचे बाजार निरीक्षक आणि कर्मचारी बाजारात होते. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तातडीने वीज खात्याच्या कर्मचार्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. वीज खात्याचे लाईनमन आदी कर्मचारी यांनी तुटलेली वीजवाहिनी जोडून वीजप्रवाह पूर्ववत् केला. ऊन-पावसापासून रक्षण होण्यासाठी ताडपत्री घालतांना विक्रेत्यांनी काळजी घेण्याचे आवाहन डिचोली पालिकेने केले आहे.