Kerala Wayanad Landslide : वायनाड (केरळ) येथील भूस्खलनात ८९ जणांचा मृत्यू

४०० हून अधिक लोक ढिगार्‍याखाली अडकल्याची शक्यता  

वायनाड (केरळ) येथील भूस्खलन

वायनाड (केरळ) – येथे मुसळधार पावसामुळे ३० जुलैला पहाटे ४ वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे ८९ जणांचा मृत्यू झाला, तर ११६ जण घायाळ झाले. अद्याप ४०० जण बेपत्ता आहेत. हे सर्व जण ढिगार्‍याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एन्.डी.आर्.एफ्.), अग्नीशमन दल आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून साहाय्यता कार्य चालू आहे, तसेच सैन्याला बोलावण्यात आले आहे. वायूदलाची २ हेलिकॉप्टर्स साहाय्य करत आहेत. साहाय्यासाठी नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले आहेत.

१. वायनाडमधील मुंडक्काई, चुरमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या ४ गावांमध्ये भूस्खलन झाले आहे. वर्ष २०१९ मध्ये याच गावांत अतीवृष्टीमुळे भूस्खलन झाले होते, ज्यामध्ये १७ लोकांचा मृत्यू झाला होता,  तर ५ जणांचा शोध लागला नव्हता.

२. भूस्खलनामुळे वायनाडमधील मुंडक्काई गावात सर्वाधिक हानी झाली आहे. येथे २५० हून अधिक लोक ढिगार्‍याखाली अडकल्याचे वृत्त आहे. येथे अनेक घरे वाहून गेली आहेत. येथे ६५ कुटुंबे रहात होती. जवळच्या चहा मळ्यातील ३५ कर्मचारीही बेपत्ता आहेत.

३.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेविषयी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, भूस्खलनाच्या घटनेमुळे मी व्यथित झालो आहे. ज्यांनी त्यांचे प्रियजन गमावले आहेत, त्या सर्वांसमवेत आम्ही आहोत. आम्ही घायाळांसाठी प्रार्थना करतो. केंद्राकडून सर्वतोपरी साहाय्य करण्यात येईल.