नागपूर – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने इकोफ्रेंडली (पर्यावरणपूरक) गणेशमूर्ती सिद्ध करणार्या मूर्तीकारांसाठी ‘इको बाप्पा ॲप’ सिद्ध केले आहे. चिकणमाती, कागदाचा लगदा, हळद, नारळ, कच्ची केळी, सुपारी आदींपासून गणेशमूर्ती घडवल्या जातात. राज्यातील अशा मूर्तीकारांचे एक चित्रीकरण प्रदूषण मंडळाने घेतले आहे. त्यानंतर ‘इको बाप्पा ॲप’ सिद्ध केले. या ॲपमध्ये प्रामुख्याने शाडूमातीपासून, तसेच इतर साहित्यांपासून गणेशमूर्ती घडवणार्या राज्यातील अनुमाने २५० ते ३०० मूर्तीकारांनी नोंदणी केली आहे. (पारंपरिक आणि शास्त्रीय पद्धतीने शाडूपासून गणेशमूर्ती सिद्ध करणे योग्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मूर्तीकारांना शाडू उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे शासन नियमांच्या विरोधात जाऊन प्रदूषण मंडळ ‘इकोफ्रेंडली’च्या माध्यमातून काय सिद्ध करत आहे ? – संपादक)
या ‘ॲप’मध्ये मूर्तीकाराचा भ्रमणभाष क्रमांक, ई-मेल पत्ता, त्याने सिद्ध केलेल्या गणेशमूर्तींचे छायाचित्र असेल. इच्छुकांनी ‘ॲप’वर जाऊन मागणी नोंदवायची आहे. गणेशमूर्तींच्या किमतीत चढ-उतार होत असल्याने ॲपवर किंमत देण्यास मूर्तीकारांनी नकार दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मिळताच पुढील आठवड्यात ‘ॲप’चे लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनी दिली.