पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज हे वाळवे बद्रुक (जिल्हा कोल्हापूर) येथील आहेत. वर्ष १९८२ मध्ये त्यांनी काडसिद्धेश्वर महाराज यांच्याकडून गुरुमंत्र घेतला, तसेच पंढरपूर येथील नामदेव टेंभूकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ते सांप्रदायिक अनुयायी बनले. त्यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. या अभंगांचे वैशिष्ट्य, म्हणजे हे अभंग सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रत्येक सोमवारी प्रसिद्ध करत आहोत.
ज्याला कळेना स्वहित । तो तरेना संसारात ।। १ ।।
जो जाणेना माया गुपित । तो कसा जाणेल भगवंत ।। २ ।।
जो जाणेना भक्ती मार्गास । तो मुकेल दैवी धनास ।। ३ ।।
दैवी धन प्राप्त केले । संसारातून मुक्त झाले ।। ४ ।।
दैवी धनाच्या सत्तेन । साधे मानव कल्याण ।। ५ ।।
– ह.भ.प. धोंडिबा रक्ताडे (महाराज), वाळवे
(साभार : ग्रंथ ‘धोंडिबाची अभंगवाणी’, खंड – १)