कुरुक्षेत्र (हरियाणा) – सप्तर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि ब्रह्मसरोवर, कुरुक्षेत्र येथील श्री कात्यायनीदेवीच्या मंदिरात दुसर्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वंदनीय उपस्थित ‘चामुंडा होम’ पार पडला. हा होम २१ जुलै २०२४ या दिवशी अर्थात् गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करण्यात आला. श्री कात्यायनीदेवीच्या मंदिरात चामुंडा होम करण्यापूर्वी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी देवीचे भावपूर्ण दर्शन घेत ‘आगामी तिसर्या विश्वयुद्धात सर्वत्रच्या साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी प्रार्थना केली. याचसमवेत कुरुक्षेत्रावरील (हरियाणा) अक्षय वटवृक्षाचे भावपूर्ण दर्शन घेत वरील प्रार्थना केली. (या वटवृक्षाखाली भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘भगवद्गीता’ सांगितली.)
कुरुक्षेत्राच्या येथे रहाणारे साधक कुटुंबीय श्री. श्रीनिवास दुधगांवकर, त्यांची पत्नी सौ. संपदा दुधगांवकर आणि मुलगा कु. स्वरूप दुधगांवकर यांनी २-३ दिवसांपासूनच चामुंडा हवनासाठीची सर्व पूर्वसिद्धता केली.
कुरुक्षेत्र येथील चामुंडा हवनाची वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे !
१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे ब्रह्मसरोवराच्या येथील श्री कात्यायनी मंदिरात आगमन होताच महंत पू. बलराम गौतमगुरुजी श्रीचित्शक्ति काकूंकडे पाहून म्हणाले, ‘‘मी अनेक वेळा कोल्हापूर श्रीमहालक्ष्मीदेवीच्या दर्शनाला गेलो आहे; मात्र आज कोल्हापूरची श्रीमहालक्ष्मीदेवी माताजींच्या (श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या) रूपात चालून आली आहे.
२. चामुंडा हवन चालू होतांना महंत पू. बलराम गौतमगुरुजी आणि समवेत अजून ४ वेदब्राह्मण उपस्थित होते. संकल्प करवून घेतांना पू. बलराम गौतमगुरुजी म्हणाले, ‘‘माताजी आताच्या काळातील झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्याप्रमाणे दिसत आहेत.’’
३. चामुंडा हवन चालू असतांना शेकडो काळे मुंगळे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या जवळ आले. ते पाहून महंत पू. बलराम गौतमगुरुजी म्हणाले, ‘‘काळे मुंगळे राहु ग्रहाचे, म्हणजे विकृतीचे प्रतीक आहेत. गोड पदार्थ किंवा अन्य कोणतेही कारण नसतांना मुंगळे येणे, म्हणजे तुमच्यावर (सनातन संस्थेवर) जारण-मारण तंत्र केल्याचे लक्षण आहे. तुमच्याभोवती एक रक्षण कवच असल्यानेच तुमच्या साडीवर एकही मुंगळा चढला नाही.’’
४. चामुंडा हवन पूर्ण झाल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी बोलत असतांना महंत पू. बलराम गौतमगुरुजी म्हणाले, ‘‘माताजी, तुमच्याकडे पाहून असे वाटते की, तुम्ही मागच्या जन्मात एखाद्या गुहेत रहात होता. तोही जन्म दैवी होता.’’
५. देवीच्या गाभार्यात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हात जोडल्यावर बाहेरून कुणीतरी शंखनाद केला. या वेळी ‘कुरुक्षेत्र ही युद्धभूमी आहे. हा शंख नाद म्हणजे कुरुक्षेत्रावर झालेला शंखनाद आहे’, असे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना जाणवले.
६. देवीच्या चरणी १८ व्या शतकांपासून प्राचीन तलवार ठेवलेली आहे. ही तलवार देवीच्या चरणांपासून कधीही हलवली जात नाही. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी देवीच्या चरणी प्रार्थना केली, त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पुजार्यांनी देवीच्या चरणी असलेली तलवार श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या कपाळाला देवीचा आशीर्वाद म्हणून लावली.
श्रीकृष्णाने महाभारत युद्धासाठी कुरुक्षेत्रच का निवडले ?
कुरुक्षेत्राची भूमी ‘कुरु’ नावाच्या राजाची भूमी होती. ‘कुरु’ राजाने धर्माचरणाने राज्य केले. राजा कुरुची इच्छा होती की, कुरुक्षेत्राची भूमी अशी असावी की, ‘ती भूमी ‘धर्माचरणा’साठी प्रसिद्ध व्हावी.’ कुरु राजाने त्यासाठी कठीण तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येमुळे सर्व देवता प्रसन्न झाले. अशा वेळी कुरु राजाला इंद्राकडून वरदान मिळाले, ‘कुरुक्षेत्राच्या भूमीत जो युद्ध करतांना मृत्यू पावणार, त्याला स्वर्गाची प्राप्ती होणार.’ हे रहस्य जगद्गुरु श्रीकृष्णाला ठाऊक असल्यानेच श्रीकृष्णाने धर्मयुद्धासाठी ‘कुरुक्षेत्र’ निवडले. (साभार : कृष्ण संकेतस्थळ)
श्रीकुरुक्षेत्राचा अगाध महिमा !
महाभारत युद्धाच्या आधी कुरुक्षेत्राला ‘ब्रह्मक्षेत्र’, ‘भृगुक्षेत्र’ असे म्हटले जात असे. कुरु राजामुळे याला ‘कुरुक्षेत्र’ असे नाव पडले. महाभारतात महर्षि व्यासांनी कुरुक्षेत्राला ‘धर्मक्षेत्र’ असे संबोधिले आहे; कारण कुरुक्षेत्राच्या भूमीत जे युद्ध लढण्यात आले, ते केवळ कौरव-पांडव यांचे युद्ध नसून ते धर्म-अधर्माचे युद्ध होते. महाभारत युद्ध हे धर्माचा न्यायनिवाडा करणारे युद्ध होते. धर्म-अधर्माच्या युद्धात धर्माचा विजय झाल्यानेच कुरुक्षेत्राला ‘धर्मक्षेत्र’ असे म्हटले आहे. महाभारत युद्ध मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला आरंभ झाले. युद्धाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे एकादशीला श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनाला ‘भगवद्गीता’ सांगितली. श्रीकृष्णाने गीतेच्या माध्यमातून मोक्षाचा मार्ग दाखवल्याने मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला ‘मोक्षदा एकादशी’ म्हटले जाते. कुरुक्षेत्रामध्ये प्रतिवर्षी मोक्षदा एकादशीला ‘गीता महोत्सव’ साजरा केला जातो.