देवाप्रती भाव असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील चि. आनंदी प्रकाश सुतार (वय ५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. आनंदी प्रकाश सुतार ही या पिढीतील एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

(‘वर्ष २०२४ मध्ये चि. आनंदी सुतार हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.’ – संकलक)

चि. आनंदी प्रकाश सुतार हिचे आई-वडील आणि आजी यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. आनंदी प्रकाश सुतार

१. सौ. प्रचीती सुतार (चि. आनंदीची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. ‘चि. आनंदी बालपणापासून हुशार आहे.

१ आ. नम्र : ती इतरांना आदराने संबोधते.

सौ. प्रचीती सुतार

१ इ. समंजस : एकदा आम्ही माझ्या बहिणीकडे तिच्या मुलीच्या लग्नानिमित्त गेलो होते. तेव्हा लग्नाच्या २ दिवस आधी बहिणीच्या सासूबाईंचे निधन झाले. तेव्हा आनंदी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होती. आम्ही आनंदीला सांगितले, ‘आजी कृष्णबाप्पाकडे गेली आहे.’ आनंदीने त्या रात्री बारा वाजल्यानंतर अंघोळ करून काळम्मादेवीला नमस्कार केला आणि नंतर ती जेवली. तेव्हा माझी बहीण म्हणाली, ‘‘आनंदी किती हुशार आहे. तिला ‘काय करायचे ?’, ते लगेच समजते. ती खरोखरच देवी आहे. आनंदीमुळे सर्वकाही ठीक होणार आहे. मला काळजी करण्याचे कारण नाही. माझी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा आहे. ते सर्वकाही नीट करणारच आहेत. त्यांनीच आनंदीला देवीच्या रूपात आपल्यासाठी पाठवले आहे.’’ त्यानंतर बहिणीच्या मुलीचे लग्न सुखरूपपणे पार पडले.

१ ई. ऐकण्याची वृत्ती : आनंदीची शाळा चालू झाल्यावर ती २ दिवस शाळेत खाऊचा डबा घेऊन गेली. नंतर मी तिला सांगितले, ‘‘शाळेतील जेवण चांगले आणि पौष्टिक असते.’’ तेव्हापासून तिने शाळेत खाऊचा डबा नेणे बंद केले आणि ती शाळेत जेवू लागली.

१ उ. घरकामात साहाय्य करणे : मी घरकाम करत असतांना आनंदी मला साहाय्य करते, उदा. लादी पुसणे, केर काढणे, केर कचरापेटीत टाकणे, अंथरूण घालणे.

१ ऊ. इतरांचा विचार करणे : एकदा मी आनंदीसह भोजनकक्षात जेवण आणण्यासाठी गेले होते. तेव्हा मला थकवा असल्यामुळे तिला उचलून घेणे शक्य नव्हते. तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘आई, मी चालत येते.’’ आमची प्रकृती ठीक नसल्यास आनंदी आम्हाला (मला, तिचे वडील आणि आजी यांना) औषध घेण्यासाठी पाणी आणून देते. आनंदी घरातील रुग्णाईत व्यक्तींची काळजी घेते. एकदा एक साधिका खोलीत पाणी घेण्यासाठी आली होती. तेव्हा आनंदी त्या साधिकेला म्हणाली, ‘‘मी तुला पाणी देऊ का ?’’

१ ए. जवळीक साधणे : ती साधिकांशी बोलून लगेच जवळीक साधते. मी तिच्या समवेत नसले, तरीही ती इतरांच्या समवेत रहाते. ती शाळेत गेल्यावर तिने एका दिवसातच सर्वांशी ओळख करून घेतली.

१ ऐ. गायींविषयी प्रेम : एकदा आम्ही निवास करत असलेल्या खोलीच्या सज्ज्यात बसलो होतो. तेव्हा आनंदीला खाली फाटकाजवळ काही गायी बसलेल्या दिसल्या. त्यांना पाहून ती मला म्हणाली, ‘‘आई, आपण त्यांना अंथरूण देऊया का ?’’ एकदा इमारतीच्या समोर एक व्यक्ती गायीला मारत असलेली पाहून आनंदी रागाने म्हणाली, ‘‘तो माणूस वाईट आहे. गायीला मारायचे नाही.’’

१ ओ. वस्तूंप्रती भाव : एकदा आम्ही महाप्रसाद घ्यायला भोजनकक्षात जात होतो. तेव्हा आम्हाला इमारतीच्या खाली एक नवीन चारचाकी गाडी दिसली. ती चारचाकी गाडी पाहून आनंदीने मला विचारले, ‘‘आई, मी या चारचाकी गाडीला प्रदक्षिणा घालू का ?’’

१ औ. रामनाथी आश्रम आणि देवता यांच्या प्रती भाव

अ. आम्ही रहायला नागेशी येथे आहोत. आनंदी झोपेतून उठल्यावर म्हणते, ‘‘आई, आपण रामनाथी आश्रमात जाऊया का ?’’ तिला आश्रमातील गणपति आणि भवानीदेवी यांच्या मूर्तींचे दर्शन घ्यायला आवडते.

आ. ती रात्री झोपतांना नेहमी देवाला डोके टेकवून नमस्कार करते. तिला देवाविषयीची गीते आवडतात. तिला काही गीते मुखोद्गत आहेत.

२. श्री. प्रकाश सुतार (चि. आनंदीचे वडील), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ अ. नम्र : ‘आनंदीला काही हवे असल्यास ती मला नम्रतेने विचारते, ‘‘बाबा, मला हे आणाल का ?’’

श्री. प्रकाश सुतार

२ आ. समाधानी वृत्ती : ती कधी कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करत नाही. तिच्याकडे जे आहे, त्यात ती समाधानी असते.

२ इ. सात्त्विक केशभूषा करण्याची आवड : तिला सात्त्विकतेची पुष्कळ आवड आहे. तिला २ वेण्या आणि अंबाडा घालायला आवडतो. तिला वेणीत गजरा घालायला आवडतो.

२ ई. देवाची आवड असणे : आनंदीला शिव ही देवता पुष्कळ आवडते. ती शिवतांडव हे नृत्य चांगल्या प्रकारे करते. तिने एखादे भक्तीगीत ऐकल्यावर ते ती गुणगुणत असते आणि त्यावर नृत्यही करते. ती अधून-मधून ‘श्री गुरुदेव दत्त।’, ‘श्री दुर्गादेव्यै नम:।’, ‘श्री गणेशाय नम:।’, ‘श्रीराम जय राम जय जय राम।’, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय।’ हे नामजप करते. ती सकाळी उठल्यावर सप्तर्षींना सांगितलेला ‘हरि ॐ  निसर्गदेवोभव वेदं प्रमाणम्।’ हा मंत्र म्हणते.

२ उ. भाव

२ उ १. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या प्रती भाव : एकदा मी तिला सांगितले, ‘‘आपल्याकडे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ येणार आहेत.’’ तेव्हा तिने मला विचारले, ‘‘माझ्या खोलीत येणार आहेत का ? त्यांना माझ्या खोलीत घेऊन येऊया.’’ त्या दिवशी तिने नवीन पोशाख घातला आणि गळ्यात माळ घातली. याविषयी तिला साधिकांनी विचारल्यावर तिने सांगितले, ‘‘आज आपल्याकडे श्रीचित्‌शक्ति अंजलीमाता येणार आहेत ना ! म्हणून मी नवीन पोशाख केला आहे.’’

२ उ २. देवाप्रती भाव : ती सकाळी उठल्यावर अंघोळ करून देवाची पूजा करते. ती देवतांची चित्रे पुसते आणि  श्रीकृष्णाच्या लहान मूर्तीला स्नान घालते. ती मूर्ती पुसून ठेवते. ती श्रीकृष्णाला कपडे घालते. आमच्याकडे एक कमंडलू आहे. ते ती नियमित स्वच्छ धुते. ती त्यात पाणी भरून ठेवते आणि आम्हाला सांगते, ‘‘देवबाप्पाला प्यायला पाणी ठेवले आहे.’’ ती पूजा करतांना ‘देवाशी बोलते’, असे मला वाटते.’

३. श्रीमती रत्नप्रभा सुतार (चि. आनंदीची आजी, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्रीमती रत्नप्रभा सुतार

३ अ. चांगली आकलनक्षमता : ‘आनंदीच्या शाळेत शिकवलेले लगेच स्मरणात रहाते.

३ आ. समाधानी वृत्ती : आनंदी तिच्याकडे जी खेळणी आहेत, त्यात समाधानी असते. तिला कोणत्याही वेगळ्या गोष्टी किंवा खेळणी यांची अपेक्षा नसते. ती खेळतांना कधीही रागवत नाही.

३ इ. देवाची आवड

१. आनंदी दिवसभर माझ्या समवेत असते. ती सात्त्विक खेळ खेळते, उदा. देवाच्या संदर्भातील खेळ खेळणे, पाटावर छायाचित्रे आणि वही ठेवून त्यांची सात्त्विक रचना करणे, रांगोळी काढणे, फुलांची सुंदर आणि सात्त्विक रचना करणे.

२. ती खेळतांना सूक्ष्मातून राम, कृष्ण आणि सीता यांच्याशी बोलते. ती मला त्यांच्या संदर्भातील कथा विचारते. ती त्या कथा सांगण्याचा प्रयत्न करते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ३१.५.२०२४)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.