डोंबिवली येथील महाविद्यालयीन अल्पवयीन विद्यार्थिनीला ॲसिड आक्रमणाची धमकी !

रिक्शाने बळजोरीने अपहरण करून धमकी देत सोडून दिले

प्रतिकात्मक चित्र

डोंबिवली – तू माझ्या बरोबर बोलली नाहीस, माझ्याशी संपर्क ठेवला नाही, तर मी तुझ्यावर ॲसिडने (आम्लाने) आक्रमण करीन आणि तुला घायाळ करीन. तुझे के.व्ही. पेंढारकर महाविद्यालयातील शिक्षण कसे पूर्ण होते ?, ते मी पहातोच, अशी धमकी देत शिळफाटा रस्त्यावरील खिडकाळी येथील १७ वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे २८ वर्षीय नितीन रवींद्र गायकवाड याने अपहरण केले. नंतर तिला मारण्याची धमकी देत सोडून दिले.

१. पीडित विद्यार्थिनी पायी महाविद्यालयाकडे जात असतांना नितीन गायकवाड मागून रिक्शा घेऊन आला. त्याने बळजोरीने तिला रिक्शात बसवले. रिक्शा सुसाट वेगाने नेऊन एका झाडाखाली उभी केली.

२. त्याने मागे बसलेल्या विद्यार्थिनीची मान हातात पकडली आणि तिला म्हणाला, ‘‘तू कुठे जातेस ? तू कुणाशी बोलतेस ? माझ्याशी संपर्क का ठेवत नाहीस ? माझ्याशी बोलत जा. मला भेटत जा.’’ तिने बोलायचे नसल्याचे सांगितल्यावर त्याने तिला वरील धमकी दिली.

३. विद्यार्थिनींनी घाबरून घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका :

  • अशी धमकी देणार्‍याला पोलिसांनी तात्काळ अटक करून  कठोर शिक्षाच करायला हवी !
  • तरुणींनीही अशांचा प्रतिकार करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकून घ्यायला हवे !