भाव आणि गुरुकार्याचा ध्यास असलेल्या कै. (श्रीमती) आदिती देवल (वय ६६ वर्षे) !

कै. (श्रीमती) आदिती देवल

१. हसतमुख 

‘देवलकाकू हसतमुख होत्या. त्यांच्या चेहर्‍यावर निरागस भाव होते.

२. शिस्तबद्ध दिनक्रम 

काकू त्यांच्या वैयक्तिक, तसेच व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भातील प्रत्येक कृती ठरलेल्या वेळेत करत असत. त्यांना शारीरिक त्रास होत असतांनाही त्या वेळेचे पालन करण्याच्या संदर्भात जागरूक होत्या.

३. सतत कार्यरत असणे

‘स्वतःचे कोणतेही काम अन्य कुणाला करावे लागू नये’, यासाठी काकूंची धडपड असे. देवाने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. त्यांनी शेवटपर्यंत त्यांच्या खोलीतील सर्व सेवा केल्या.

४. वाचनाची आवड 

काकूंना राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याशी संबंधित लिखाणाचे वाचन करण्याची आवड होती. त्या प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’चे संपूर्ण वाचन करत असत.

५. गुरुकार्याचा ध्यास

५ अ. देहभान विसरून सेवा करणे : काकू लिखाणाचे संकलन करण्याची सेवा करत असत. त्यांनी अंतिम संकलक होण्यासाठी पुष्कळ परिश्रम घेतले. त्या स्वतःला होणार्‍या शारीरिक त्रासांचा विचार न करता देहभान विसरून सेवा करत असत. तातडीची सेवा असल्यास त्या अधिक वेळ देऊन सेवा पूर्ण करायच्या. परिपूर्ण सेवा करण्याची त्यांची तळमळ शिकण्यासारखी होती.

५ आ. लिखाणाशी एकरूप होऊन संकलन करणे : काकू ‘कर्मयोग’, ‘ज्ञानयोग’ आणि ‘भक्तीयोग’ यांची सांगड घालून सेवा करण्याचा प्रयत्न करत असत. त्या लिखाणाशी एकरूप होऊन संकलन करत असत.

६. पू. संदीप आळशी यांनी काढलेले कौतुकोद्गार !

एकदा पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे संत) काकूंना म्हणाले, ‘‘तुम्ही सेवेतील फार मोठा टप्पा गाठला आहे !’’

७. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असूनही कर्तेपणा देवाला अर्पण करणे

साधकांना आध्यात्मिक त्रास होत असल्यास काकू साधकांसाठी अचूक नामजपादी उपाय सांगत. त्या सांगत, ‘‘मी केवळ देवाला प्रार्थना करते. नंतर सर्व देवच पहातो.’’ प्रत्येक वेळी त्या कर्तेपणा देवाला अर्पण करत असत.

८. भाव

अ. खोलीतून बाहेर जातांना काकू प्रत्येक वेळी खोलीत असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राला भावपूर्ण नमस्कार करत. (याचे अनुकरण सर्वच साधकांना करता येईल.)

आ. जानेवारी २०२४ मध्ये एकदा देवाला वाहिलेली फुले त्यांतील चैतन्य मिळण्यासाठी दुसर्‍या दिवशी साधकांना दिली होती. काकूंना ती फुले मिळाल्यावर त्यांनी ती संगणकासमोर ठेवली. काकूंमधील भावामुळे फुले अनेक दिवस चांगली राहिली.

इ. काकू प्रत्येक कृती देवाला सांगून करत असत. त्यांचे गुडघे दुखत असूनही त्या ध्यानमंदिरात नामजप करायला बसण्यापूर्वी आणि नामजप करून झाल्यानंतर भूमीवर मस्तक टेकवून नमस्कार करत असत.

ई. काकूंची दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून भावजागृती होत असे. त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेषांक भावपूर्णरित्या जतन केले आहेत.’

– ग्रंथांशी संबंधित सेवा करणारे साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.७.२०२४)