चिखल कालो महोत्सवात सहस्रो नागरिकांचा सहभाग

चिखल कालो परंपरेत नागरिकांसह सहभागी पर्यटनमंत्री रोहन खंवटे

माशेल, १८ जुलै – माशेल येथील ‘चिखल कालो’ महोत्सवाचा १८ जुलैला श्री देवकीकृष्ण मंदिर मैदानात अनेक नेत्रदीपक उपक्रमांसह समारोप झाला. या उत्सवाने अनेक पिढ्यांपासून उत्सवाचा भाग असलेल्या पारंपरिक मातीच्या खेळासह स्थानिक आणि पर्यटक यांची मने जिंकली आहेत. शाश्वत पर्यटन पद्धतींसमवेत सांस्कृतिक वारसा एकत्रित करून, चिखल कालो महोत्सव पर्यटन विभागाच्या ‘पुनर्संचयित पर्यटन’ आणि ‘गोवा समुद्रकिनार्‍यांच्या पलीकडे’ या प्रयत्नांची प्रशंसा करतो. हा महोत्सव स्थानिक समुदायांचे जीवन त्यांच्या सांस्कृतिक वारशाने समृद्ध करते आणि अभ्यागतांना एक अस्सल आणि परिवर्तनीय अनुभव देते. या महोत्सवात सहस्रो नागरिक सहभागी झाले होते.

या कार्यक्रमात पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आध्यात्मिक संबंध आणि सांस्कृतिक जतन करण्याचे माध्यम म्हणून अशा सांस्कृतिक उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या महत्त्वावर जोर दिला. ते म्हणाले, ‘‘आज आम्ही वेगवेगळ्या गावांतील सर्वांसमवेत चिखल कालो साजरा करण्यासाठी आलो आहोत. आम्ही नेहमी गोवा हे समुद्रकिनारी फिरण्याचे ठिकाण आणि ‘पार्टी लाइफ प्लेस’ (मेजवान्या करण्याचे ठिकाण) असल्याबद्दल बोलतो; पण गोव्यात पहाण्यासारखे, अनुभवण्यासारखे त्याहून अधिक आहे. गेल्या २ वर्षांपासून आम्ही लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. गोव्याची खरी परंपरा, संस्कृती आणि वारसा हा सण आपल्याला पावसाचे महत्त्व शिकवतो, तसेच आपल्या वारशाचा, आपल्या अध्यात्माचा आणि आपल्या सामुदायिक भावनेचा प्रचार करतो. यातून आम्ही केवळ आमच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपत नाही, तर समुद्रकिनार्‍यांच्या पलीकडे गोवा असलेल्या पुनर्संचयित पर्यटनाच्या तत्त्वांनाही पुढे नेत आहोत.’’

श्री देवकीकृष्ण मंदिरात १६ जुलैला उत्सव चालू झाला. स्थानिक बचत गटांना त्यांच्या स्थानिक पाककृती आणि उत्पादने यांचा प्रचार करण्याची संधीदेखील दिली गेली. पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांची अभंगवारी मैफील होते. दुसर्‍या दिवशी लोकनृत्य, पारंपरिक संगीत आणि संवादात्मक कार्यशाळा यासह सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गेले. शेवटचा दिवस १८ जुलै हा पारंपरिक चिखल कालो उत्सवाच्या उत्साहाने चालू झाला. तरुण पिढी यात रममाण झाली होती. दहीहंडी फोडल्याने दिवस आणखी उजळला.