रयत शिक्षण संस्थेतील निकृष्ट कामांविषयी नागरिकांचे उपोषण !

रयत शिक्षण संस्थेतील निकृष्ट कामांविषयी नागरिकांचे उपोषण

सातारा, १८ जुलै (वार्ता.) – कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वसामान्यांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. याच रयत शिक्षण संस्थेचे ‘रयत सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर’ हे रामनगर, वर्ये येथे आहे. नागरिकांनी येथील कामाच्या निकृष्ट प्रतीविषयी रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाला निवेदन दिले होते; परंतु त्याची नोंद घेण्यात आली नाही. त्यामुळे आता याविषयी जागृत नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपोषणाला प्रारंभ केला आहे.

वर्ये, रामनगर येथे असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या एका महाविद्यालयाचा ठेका एका आस्थापनेला देण्यात आला आहे. या आस्थापनाकडून महाविद्यालयाचे करण्यात येणारे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून याविषयी नागरिकांनी अनेक वेळा रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार केला; मात्र याला रयत व्यवस्थापनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली. हा विषय अत्यंत गंभीर असून सातारा जिल्हाधिकारी यांनी यावर तातडीने कारवाई करावी आणि संबंधितांवर गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी नागरिकांनी उपोषण चालू केले आहे.

या महाविद्यालयात अनेक जाती धर्मातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. एखादी घटना घडून गेल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी होते; मात्र याविषयी माहिती देऊनही रयत शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन कोणतीही कार्यवाही करत नाही, याला लोकशाही म्हणायचे का ? असा प्रश्न उपोषणकर्त्यांना पडला आहे.

रयत शिक्षण संस्थेसारख्या नावाजलेल्या शिक्षण संस्थेत एखाद्या ठेकेदाराची चूक निदर्शनास आणूनही त्याकडे दुर्लक्ष करणे, हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार रयत शिक्षण संस्थेमधून नाहीसे झाल्याचेच द्योतक आहे, असे समजायचे का ? असा प्रश्नही उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.